Sat, Apr 20, 2019 08:47होमपेज › Kolhapur › गायीला वैज्ञानिक द‍ृष्टिकोनातून वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

गायीला वैज्ञानिक द‍ृष्टिकोनातून वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:20AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. यामुळे पूर्वी एका माणसामागे 100 गायी असायच्या. मात्र, कालओघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. किंबहुना माणूस आपल्या मनानेच जीवसृष्टीची रचना करू पाहात आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षित लोकांकडूनच सर्वाधिक हानी होत आहे. यामुळे शालेय शिक्षणात गायींना तारण्याचे शिक्षण देणे काळाची गरज आहे. गायीला वैज्ञानिक द‍ृष्टिकोनातून वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कणेरी मठाचे परमपूज्य काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी केले. 

शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड उत्सव समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार कोल्हापूर बजरंग दल जिल्हाप्रमुख संभाजी ऊर्फ बंडा  साळुंखे यांना देऊन गौरविण्यात आले. याबद्दल विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात सोमवारी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प.पू. अद‍ृश्य काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या हस्ते आणि शिवप्रताप दिन उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सौ. गौरी साळुंखे यांचा सत्कार सौ. मयुरी उरसाल यांच्या हस्ते झाला. 

यावेळी एकबोटे यांनी शिवप्रताप दिन राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून राज्य शासनाने जाहीर करावा, अशी मागणी करत बजरंग दलाने शिवचरित्र अभ्यासवर्ग सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद भावे, बजरंग दलाचे शहर अध्यक्ष महेश उरसाल, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, किशोर घाडगे, जयकुमार शिंदे-किसन कल्याणकर, श्रीकांत पोतनीस, राजू यादव, दुर्गेश लिंग्रस,  सुनील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.