Mon, Feb 18, 2019 01:21होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : गडहिंग्लजमधील काळभैरव मंदिरात लाखोंची चोरी 

कोल्‍हापूर : काळभैरव मंदिरात लाखोंची चोरी 

Published On: Feb 23 2018 11:06AM | Last Updated: Feb 23 2018 1:49PMगडहिंग्लज: प्रतिनिधी 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरी मंदिरामध्ये गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली. यात ६० हजार रु. चांदीचे नक्षीकाम केलेली काळभैरी देवाच्‍या मूर्तीच्‍या मागे असलेली प्रभावळ , ५ हजार रू. चे काळभैरी देवाच्‍या मूर्तीच्‍या हातातील चांदीची तलवार, १० हजार रू. ची जोगेश्‍वरी देवीच्‍या गळ्‍यातील चांदीच्‍या साखळीतील सोन्‍याची दोन वाटी आणि चार मणी असलेले मंगळसूत्र, १० हजार रु. चा काळभैरी देवाच्‍या हातातील चांदीचा त्रिशुल तसेच १३ हजार रु. चा काळभैरी देवाचा राजदंड व चांदीची छडी असा एकूण ९८ हजार रु. चा माल चोरीस गेला आहे. 

मंदिराचे पुजारी संजय गुरव हे आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास पूजेसाठी मंदिराकडे गेले असता त्यांना मंदिराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्याने आत जाऊन पाहिले असता मंदिरातील अन्य दागिने तसेच प्रभावळ चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांशी संपर्क  साधण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळाचे ठसे घेण्यासाठी कोल्हापूरहून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून श्वानपथक मागवण्यात आले. येथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन तरूण चोरी करत असल्याचे लक्षात येते, मात्र यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरी मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच गडहिंग्लज शहरासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरावर जमा झाले होते. श्रद्धास्थान असलेल्या काळभैरी मंदिरात अशा पद्धतीने धाडसी चोरी करण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.