Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Kolhapur › काळम्मावाडी 93 टक्के भरले

काळम्मावाडी 93 टक्के भरले

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:50PMकाळम्मावाडी : वार्ताहर

दुधगंगानगर (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू सागरात 92.97 टक्के पाणीसाठा झाला असून, धरण परिसरात गेले चार दिवस पावसाचा जोर असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाच वक्राकार दरवाजातून प्रतिसेकंद दूधगंगा नदीपात्रात 1500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज अखेर धरण परिसरात 2747 मी. मीटर पाऊस झाला असून धरणाची पाणी पातळी 644.50 मीटर तर पाणीसाठा 668.610 द. ल. घ. मी. (23.60 टी. एम. सी.) म्हणजे 92.97 टक्के धरण भरले आहे .

चालू वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली. परिणामी धरणाच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू केला. धरणाच्या पायथ्याशी 12 बाय 12 ची दोन्ही जलविद्युत केंद्रे बंद असल्याने विसर्ग होणारे पाणी वाया गेले. येथील युनिट 1 सुरू होण्याची शक्यता होती. पण अद्याप सुरू नाही तर  युनिट 2 सुरू होण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, परिणामी विद्युत महामंडळास वीज निर्मितीचा फटका बसणार आहे. जुलै महिन्यात नऊ दिवस धरणातून विसर्ग सुरू होता. तर ऑगस्टमध्ये विसर्ग सुरू झाल्याने पाणी वाया जात असल्याने संबंधित विभागाकडून जलविद्युत केंद्राची देखभाल, दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

पाणलोट क्षेत्रात संततधार ः 12 बंधारे पाण्याखाली

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार तर शहर व परिसरात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. शहरात तर ऊन-पावसाचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, पंचगंगेची पातळी 28 फूट असून जिल्ह्यातील 12 बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत.  

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 10.90 मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक 29.50 मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात झाला. 

जिल्ह्यातील सर्वच धरणात 90 टक्क्याहून जास्त पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणात 8.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.