Sat, Jun 06, 2020 20:35होमपेज › Kolhapur › ‘कळंबा’ जानेवारीतच 23 फुटांवर!

‘कळंबा’ जानेवारीतच 23 फुटांवर!

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:31PMकळंबा : वार्ताहर

कळंबा परिसरामधील भूजल पातळीत मोठी घट होत असून कळंबा तलावातील पाणी पातळी तेवीस फुटांवर पोहोचली आहे. तलावातील बेसुमार पाणी उपशामुळे साडेतीन महिन्यात चार फुटाने पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच तलावाच्या परिसरामधील अनेक विहिरी, कुपनलिका यांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, तलावाच्या गळतीचे  काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

कळंबा तलावामधून दररोज सहा एम.एल.डी. पाणी उपसा केला जात आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहिला होता. पाणी पातळी सत्तावीस फुटांवर पोहोचली होती. मात्र, कळंबा, पाचगाव व निम्म्या शहराला दररोज विभागून बावीस तास तलावामधून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे सहा एम.एल.डी. पाणी उपसा तलावातून होत असल्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. पाणीपुरवठ्याचे कोल्हापूर महापालिका, कळंबा, पाचगाव ग्रामपंचायत प्रशासन यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बेसुमार पाणी उपशामुळे तलावातील पाणी साठा एप्रिलअखेर पर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. एक दिवसाआड तसेच पाणी उपशाचे तास कमी करून तलावामधून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे  आहे. अन्यथा कळंबा गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तलावाबरोबर कळंबा, कात्यायनी परिसरामधील अनेक कुपनलिका, विहिरी यामधील हे पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे शेतीला पाणीपुरवठा कमी होऊ लागला आहे. तीन ते पाच फुटांपर्यंत पाणी पातळीत घट झाल्याचे शेतकर्‍यांमधून सांगण्यात येत आहे.