Mon, May 20, 2019 20:18होमपेज › Kolhapur › कागल तालुक्यातील शाळांत डिजिटल क्रांती!

कागल तालुक्यातील शाळांत डिजिटल क्रांती!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:40PMहमिदवाडा : मधुकर भोसले 

प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी दर्जा वाढवणे अत्यावश्यक आहे. आधुनिक काळात ई-लर्निंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळेच 14 व्या वित्त आयोगातील निधीचा भरघोस विनियोग शाळेसाठी करण्याची तरतूद सरकारने केली, पण फक्‍त याच निधीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून देखील शाळा स्मार्ट करण्यासाठी कागल तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच सध्या तालुक्यात प्राथमिकचे 467 वर्ग डिजिटल झाले आहेत, तर सर्वच्या सर्व वर्ग डिजिटल शाळा 34 आहेत.

कागल तालुक्यात एकूण 121 प्राथमिक शाळा आहेत. मंजूर शिक्षक संख्या 721आहे, तर कार्यरत शिक्षक संख्या 670 इतकी आहे. प्राथमिक शाळांचा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. अशावेळी या शाळा खासगीला शह देण्यासाठी समर्थ होणे गरजेचेच आहे.त्याचप्रमाणे प्रचलित शिक्षण पाहणीपेक्षा द‍ृक व श्राव्य पद्धतीतील या ई-लर्निंग पद्धतीचा चांगला प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो, असे निरीक्षण आहे. जे शिकवले जाते ते चित्र, आवाज, व्हिडीओ आशा माध्यमातून समोर दाखवले जात असल्याने मुलेही रमतात. 

त्याबरोबरच सदर एलईडी स्क्रिन व अभ्यासक्रम मुलेदेखील हाताळू शकतात. एका वर्गासाठी अभ्यासक्रमासह वर्ग डिजिटलचा खर्च 35 ते 45 हजारपर्यंत जातो. लोकसहभागातून वर्ग ई-लर्निंग करताना व्यक्‍तिगत, सहकारी संस्था, मंडळे, सेवाभावी संस्था यांच्याकडून निधी जमा करतानाच कागल तालुक्यातील या शाळांना पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांनी देखील चांगली मदत केली आहे. त्यामुळे ई-लर्निंगचा हा प्रकल्प इतक्या गतीने पुढे आला. आतापर्यंत 1 कोटी 36 लाख रुपयांचा उठाव या उपक्रमांतर्गत झाल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ.जी. बी. कमळकर यांनी सांगितले. आता उर्वरित वर्गही डिजिटल करण्याबाबत शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

ग्रामपंचायतीचे सहकार्य अन्...
या मोहिमेत ग्रामपंचायतींचे सहकार्य अनेक ठिकाणी चांगले लाभले. ग्रामसेवकांनी शाळा व मुख्याध्यापकांना एलईडी, अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तर काही ठिकाणी मात्र अमूक कंपनीचाच एलईडी घेण्याचा हट्ट काही ग्रामसेवकांनी केल्याची व त्यामुळे संबंधित शाळेत या सुविधा बसवण्यासाठी विलंबही लागल्याची चर्चा आहे.