Wed, Jan 23, 2019 12:42होमपेज › Kolhapur › तूरडाळ वितरणाबाबत रेशन दुकानदार अडचणीत

तूरडाळ वितरणाबाबत रेशन दुकानदार अडचणीत

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:32AM

बुकमार्क करा

कागल : बा. ल. वंदुरकर

शासनाने रेशनकार्डावर मुबलक तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, मात्र पुरेशी डाळ उपलब्ध नसल्याने अपुर्‍या डाळीचे वितरण कसे करायचे याची चिंता जिल्ह्यातील सर्व तालुका पुरवठा विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदारांना लागून राहिली आहे. या डाळीचे पैसे स्वस्त धान्य दुकानदारांनी इंडियन बँकेच्या शाखेत भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांशी तालुक्याच्या ठिकाणी या बँकेच्या शाखा नसल्यामुळे  पैसे भरायचे कसे आणि कोठे? याची चिंता लागून राहिली आहे.

राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानामार्फत वितरित करावयाच्या सूचना देण्यात आल्या. तूरडाळीच्या विक्रीसाठी डिसेंबर महिन्याकरिता 0.70 प्रतिकिलो या प्रमाणे रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 54.30 प्रति किलो यामधील रक्कम 50 रुपये प्रतिकिलो प्रमाणे एकत्रित करून रोखीने किंवा आरटीजीएसने दि महाराष्ट्र स्टेट को ऑफ फेडरेशन मुंबई यांच्या नावे इंडियन बँकेच्या खात्यावर जमा करावयाची आहे. काही दुकानदारांनी इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पैसे भरण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही बँकेने पैसे भरून घेण्यास नकार दिला. दुसर्‍या बँकेचे पैसे भरून घेतले जाणार नाही असे म्हणून नाकारण्यात आले. त्यामुळे तूरडाळीचे पैसे भरण्यासाठी अडचणीचे झाले आहे. या सर्व दुकानदारांना कोल्हापूर शहरात जाऊन इंडियन बँकेच्या शाखा शोधून पैसे भरावे लागणार आहेत.