Tue, May 21, 2019 18:51होमपेज › Kolhapur › कागल राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांचा निषेध

कागल राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांचा निषेध

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:52AMकागल : प्रतिनिधी

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी कर्नाटकात जाऊन कन्‍नड गीत गायल्याप्रकरणी त्यांचा निषेध करण्याकरिता बेळगाव येथून कोल्हापूर येथे येणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा देण्याकरिता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकत्यांनी गर्दी केली होती. यावेळी या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ना. पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर कोगनोळी टोल नाक्यावरच अडविण्यासाठी करवीर विभागीय पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, गोकुळ शिरगाव सहायक पोलिस निरीक्षक खाडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके यांच्यासह पोलिस सकाळी आठ वाजल्यापासूनच नाक्यावर थांबलेले होते; मात्र अन्य मार्गांनी कार्यकर्ते कोल्हापूरला पोहोचले. 

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, पालिका पक्षप्रतोद नितीन दिंडे त्याचबरोबर नगरसेवक बाबासो नाईक, सतीश गाडीवड्ड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.