होमपेज › Kolhapur › जि.प. सदस्या विजया पाटील यांना दिलासा

जि.प. सदस्या विजया पाटील यांना दिलासा

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 10:50PMकबनूर : वार्ताहर

कोल्हापूर येथील जात पडताळणी विभागीय समितीने येथील जि.प. सदस्या विजया पाटील यांचा इतर मागासवर्गीय जातीचा दाखला अवैध ठरवला होता. या विरोधात पाटील यांनी उच्च न्यायालयात नोव्हेंबर 2017 मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली  आहे.  फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघातून पाटील यांनी नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांनी कांता बडवे यांचा पराभव केला होता.

मात्र, बडवे व मिलिंद कोले यांनी पाटील यांचा जातीचा दाखला खोटा असल्याची तक्रार जातपडताळणी विभागीय समितीकडे केली  होती. त्यामध्ये समितीने पाटील यांचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने पाटील यांना दिलासा मिळाला आहे. आता याबाबतची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार  आहे.