होमपेज › Kolhapur › शिंदेवाडीत घराघरांत जडलीय कबड्डीची आपुलकी!

शिंदेवाडीत घराघरांत जडलीय कबड्डीची आपुलकी!

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 8:52PMभडगाव : एकनाथ पाटील

महाराष्ट्रीयन रांगड्या मैदानी कबड्डी खेळाला प्रो-कबड्डीमुळे आज हा जागतिक पातळीवर लौकिक मिळत आहे. मात्र, हीच  प्रो-कबड्डीची संकल्पना 1979 मध्ये आकाराला आणली ती शिंदेवाडी (ता. कागल) येथील नवजवान तरुण मंडळाने. गेल्या 35 वर्षांपासून या मंडळाने महिला व पुरुष खुल्या गटातील अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागात या खेळाबद्दलची रूची व आत्मियता कायम ठेवली आहे, वाढवली आहे. चार दिवस चालणारी ही स्पर्धा म्हणजे खेळाडू व शौकिनांसाठी पर्वणीच असते.

शिंदेवाडी या कागल तालुक्यातील छोटेखानी गावात 1975 साली स्थापन झालेल्या नवजवान तरुण मंडळाने सुरुवातीला जिल्हास्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या आयोजनास सुरुवात केली होती. 1982 पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. तर 1989 ला या मंडळाने महिलांच्या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ केला. ग्रामीण भागात महिलांची कबड्डी स्पर्धा भरवणे आव्हानात्मक काम असतानाही  गावकर्‍यांनी मोठ्या आत्मियतेने महिला व पुरुष संघांना दत्तक घेत खेळाडूंना चार दिवस आपल्या घरातीलच हे खेळाडू असल्याप्रमाणे त्यांची सोय करतात. 

 आज खेळाला प्रो-कबड्डीचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी संघ दत्तक घेऊन स्पर्धा पूर्ण होईपर्यंत संघाचे पालकत्व स्वीकारून  त्या संघाची जेवणाची, राहण्याची किंबहुना त्या संघाची पूर्ण जबाबदारी संबंधित ग्रामस्थ  घेत असतात. जी प्रो-कबड्डीत पद्धत आहे. तीच पद्धत या ठिकाणी 35 वर्षांपासून अवलंबली जाते. अशा भावन क्रीडाप्रेमींतून व्यक्त होत आहेत. या स्पर्धेत दबंग दिल्लीकडून खेळणारा अनंत पाटील या स्पर्धेत छावा शिरोली क्रीडा मंडळाकडून तर जयपूर पिंक पँथरकडून खेळणारा तुषार पाटील शाहू सडोलीकडून खेळणार आहे.

तर दबंग दिल्लीचा काशीलिंग आडके याचीही हजेरी असणार आहे. आज या खेळामध्ये व्यावसायिकता आली आहे. खेळाचा स्तर व दर्जा बदलत आहे. मातीतील कबड्डी स्पर्धा मॅटवर गेली. या नवजवान तरुण मंडळाने देखील बदल  स्वीकारत जिल्ह्यात ग्रामीण भागात पहिल्यांदा सन 2013 पासून राज्य पातळीवरील महिलांच्या व पुरुषांच्या मॅटवरील प्रो-कबड्डीच्या नियमानुसार स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. या स्पर्धेमध्ये पुणे येथील चार, मुंबई येथील पाच, यासह उपनगर गोरेगाव, पालघर, रायगड, सातारा, नाशिक, सोलापूर, सातारा, कासेगाव यासह जिल्ह्यातील नामवंत अशा महिला व पुरुष अशा एकूण 36 संघाचा सहभाग आहे.

या स्पर्धेत साडेचारशे हून आधिक खेळाडूंचा सहभाग असतो. तर साठ पंच आहेत. चार दिवस ही स्पर्धा सुरू राहाणार आहे. चार आकर्षक क्रीडांगणे तयार केली आहेत. गॅलरीमध्ये सुमारे पन्नास हजार प्रेक्षक बसतील, अशी बैठक व्यवस्था केली असून ही स्पर्धा प्रकाशझोतात होत आहे. टी. व्ही. स्क्रीनची देखील व्यवस्था करण्यात अली आहे. स्पर्धेसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च असून लोकवर्गणीतून या स्पर्धेला पाठबळ मिळत आहे.