Thu, Apr 25, 2019 13:42होमपेज › Kolhapur › हजारो भाविकांच्या साक्षीने जोतिबाचा दुसरा खेटा

हजारो भाविकांच्या साक्षीने जोतिबाचा दुसरा खेटा

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 11 2018 11:53PMजोतिबा : वार्ताहर  

जोतिबा डोंगरावर रविवारी (दि. 11) दुसरा खेटा सुमारे 70 हजार भाविकांच्या उपस्थितीत ‘चांगभलं’च्या गजरात पार पडला. या दुसर्‍या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापूरचे नूतन अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी ‘श्रीं’चे दर्शन घेऊन मंदिर आणि परिसराची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला.

आज पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडल्या. सकाळी 9 वाजता ‘श्रीं’ची सरदारी स्वरूपातील बैठी पूजा बांधण्यात आली. सकाळी 11 वाजता ‘श्रीं’चा धूपारती सोहळा संपन्न झाला. रात्री 8.30 वाजता जोतिबा मंदिरामध्ये पालखी सोहळा संपन्न झाला. आज सकाळी 6 वाजल्यापासूनच भाविकांनी 2 पदरी दर्शन रांगेतून दर्शन घेतले. 

दर्शन रांगेला शिस्त लागावी म्हणून गावातील तरुणांनी आणि पुजारीवर्गाने दर्शन रांगेवर शेडनेट बांधले होते, यामुळे दर्शन रांगेत मध्येच घुसणार्‍या आणि वशिलेबाजी करणार्‍या भाविकांवर चांगलाच चाप बसला. देवस्थान समितीच्या वतीने आणि भाविकांनी जोतिबा मंदिरामध्ये ठिकठिकाणी प्रसाद वाटप केले. शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आर.आर. पाटील आणि कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि मंदिर परिसरात सुमारे 100 पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पहिल्या खेट्याला एका भाविकाचा वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर दैनिक ‘पुढारी’ने जोतिबा डोंगरावरील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन देवस्थान समितीच्या वतीने आज जोतिबा मंदिरामध्ये भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोफत आरोग्य सुविधा पुरवणार्‍या पथकाचे आयोजन केले होते.