Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Kolhapur › दख्खनच्या राजाच्या दरबारात सुविधांची वानवा!

दख्खनच्या राजाच्या दरबारात सुविधांची वानवा!

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:07AMजोतिबा : अमोल शिंगे 

शैलेंद्र देशपांडे या भाविकाचा जोतिबा डोंगर येथे वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जोतिबाच्या भाविकांना आणि ग्रामस्थांना मिळणार्‍या अपुर्‍या मूलभूत सुविधांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नेहमी भाविकांची गर्दी असणार्‍या जोतिबा डोंगरावर  तातडीची आवश्यकता असतानाही भाविकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ न शकल्याने  भाविक आणि ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. 

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर हे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. चैत्र पौर्णिमा आणि श्रावण षष्ठी यासारख्या मोठ्या यात्रा काळातच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य आणि आपत्कालीन विभागाच्या सुविधा पुरविल्या जातात, पण एरव्ही  सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते.  आरोग्य सुविधांच्या बाबतीत तर जोतिबा डोंगर नेहमीच वंचित राहिला आहे.

फक्‍त औपचारिकता म्हणून जिल्हा परिषदेचे एक आरोग्य उपकेंद्र जोतिबा डोंगरावर उभे करण्यात आले आहे. परंतु, त्या मानाने तिथे उच्च दर्जाच्या सुविधाच उपलब्ध नाहीत. सकाळी 11 ते सायंकाळी 5 असे काम येथे केले जाते. जोतिबा सारख्या यात्रेच्या ठिकाणी 24 तास आरोग्य सेवा पुरविण्याची गरज असताना 11 ते 5 असे मर्यादित वेळेत हे आरोग्य केंद्र चालवले जात आहे. या आरोग्य केंद्रात एक रुग्णवाहिका आहे, पण मंदिर परिसरातसुद्धा देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 

रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी जोतिबा मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग पोलिस विभागाच्या वतीने बंदोबस्ताचा भाग म्हणून आडवे लोखंडी नळ टाकून 4 ठिकाणी बंद केले जातात. त्यामुळे आरोग्य विभागाजवळची रुग्णवाहिका वेळेत मंदिरापर्यंत पोहोचेल असे नाही, म्हणून मंदिर परिसरातसुद्धा कायमस्वरूपी एक रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मंदिर आणि परिसरात कायमस्वरूपी आपत्कालीन काळात सुविधा पुरविणारे एक पथकसुद्धा जोतिबा डोंगरावर असणे काळाची गरज बनली आहे.  शैलेंद्र देशपांडे यांच्या मृत्यूमुळे जोतिबाच्या भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या अपुर्‍या मूलभूत सुविधांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन सुविधांसाठी भरीव तरतूद मंजूर करून घेतली पाहिजे.