Sat, Mar 23, 2019 18:06होमपेज › Kolhapur › ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा खेटे सुरू

‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा खेटे सुरू

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:54AMजोतिबा : वार्ताहर

वाडीरत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे रविवारपासून श्री जोतिबाच्या खेट्यांना सुरुवात झाली. पहिल्या खेट्याला सुमारे एक लाख भाविकांची उपस्थिती होती. गुलाल-खोबर्‍याची उधळण आणि ‘चांगभलं’च्या गजराने डोंगर दुमदुमून गेला. 

शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.  मंदिरातील  नित्य धार्मिक विधी पार पडले.  ‘श्रीं’ना महाभिषेक झाल्यानंतर श्री जोतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. 

सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी दोन पदरी दर्शन रांग लावली होती. वाढती गर्दी आणि दर्शन रांग लक्षात घेऊन जोतिबा डोंगरावरील सुमारे 60 तरुणांनी पोलिस आणि देवस्थान समिती  कर्मचार्‍यांना दर्शन रांगेसाठी सहकार्य केले. सकाळी सहापासून ते पालखी सोहळ्यापर्यंत हे तरुण मंदिरात उपस्थित होते. रात्री 8:30 वाजता पालखी सोहळा झाला. रात्री 12 पर्यंत भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते. कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अलीकडे ‘वशिलेबाज’ भाविकांकडून दर्शनासाठी वाद घालण्याचे प्रमाण वाढले आहेत. असे भाविक पोलिस, पुजारी, देवस्थान समितीचे कर्मचारी यांच्याबरोबर हुज्जत घालतात. आजही असा प्रकार घडला.  यामुळे दर्शन रांगेतील भाविक, पोलिस व पुजार्‍यांत बर्‍याच वेळा वादही झाले आहेत. अशा ‘वशिलेबाज’ भाविकांवर  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाविक आणि पुजारी वर्गातून होत आहे.