Tue, Jul 16, 2019 00:22होमपेज › Kolhapur › नोकर्‍या आहेत ‘स्किल’ पाहिजे...

नोकर्‍या आहेत ‘स्किल’ पाहिजे...

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:07PMकोल्हापूर : विजय पाटील

नोकरी करायची इच्छा आहे; पण नोकर्‍या नाहीत... आम्ही काय करू...  सर्वत्र बेरोजगारी वाढलीय, अशी चर्चा  सर्वत्रच ऐकायला मिळते. असे असले तरी सध्या कुशल कामगारांना मोठी मागणी आहे. फौंड्री इंडस्ट्री, हॉटेल उद्योग, हॉस्पिटल्स आदी विविध क्षेत्रांत सुमारे पंधरा हजारांहून अधिक नोकर्‍या  उपलब्ध आहेत, या क्षेत्रांकडे तरुणाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

सरकारी नोकरीच्या अट्टाहासामुळे तरुणाईची अनेक वर्षे वाया जात आहेत. सरकारी नोकर्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. एका-एका जागेसाठी दोन-दोन हजार अर्ज येत आहेत. या आकडेवारीतून सरकारी नोकरीची वास्तव स्थिती लक्षात येते. अशा स्थितीत नोकर्‍यांची निर्माण होत असलेली नवनवी कवाडे आता कवेत घेण्यासाठी तरुणाईने ‘स्किलफुल’  असायला हवे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील नोकर्‍यांमध्ये आता पगार आणि इतर सुविधांमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. उलट, काम करणार्‍यांसाठी खासगी क्षेत्रात प्रचंड संधी आहे.

पोलिस किंवा लष्करात भरती असली की शे-दोनशे जागांसाठी लाखो युवक प्रयत्न करतात. बँकिंगमधील एका क्लार्कच्या जागेसाठीही हजारो तरुण अर्ज करतात. गावातल्या सोसायटीत किंवा पतसंस्थेत शिपाईपदासाठी तर अनेक जण स्थानिक नेत्यांच्या घरांचे उंबरठे झिजवतात. सध्या ‘गोकुळ’मध्ये सुरू असलेल्या भरतीच्या चर्चेत अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. काय पण करा, पण ‘गोकुळ’ला लावा, यासाठी कार्यकर्ते नेत्यांची मनधरणी करत आहेत. सोसायटी आणि दूध डेअरीच्या नोकरीच्या मागे अडकून पडली आहे. ही पारंपरिक मानसिकता आता भेदायला हवी. 

एमआयडीसीत अनेक संधी...

एमआयडीसीमध्ये व्हीएमसी, सीएनसी आणि एचएमसी या मशिनरींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे; पण या मशिनरीसाठी लागणारे ऑपरेटर मात्र फार कमी आहेत. एमआयडीसीत सुमारे 5 हजार ऑपरेटर्सची आवश्यकता आहे. त्यामुळेच अनेक कारखान्यांच्या बाहेर ऑपरेटर पाहिजेत, अशा जाहिराती झळकू लागल्या आहेत. फौंड्री उद्योगातही मोल्डर पदांसाठी मनुष्यबळाचा तुटवडा आहे. इतर कामांसाठी लागणारे हजारो लेबर हे उत्तर प्रदेश आणि बिहारी आहेत. स्थानिक माणसे यासाठी मिळतच नाहीत, असे दिसते. 

हॉटेल व्यवसाय - चांगला कूक कुठे मिळेल? अशी हॉटेल क्षेत्रातून सातत्याने चौकशी केली जाते.  वेटर, किचन व्यवस्थापनासाठीही माणसे मिळत नसल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे मत आहे. किमान चार हजारांवर नोकर्‍या या क्षेत्रात असल्याचे सांगण्यात आले. 

बांधकाम क्षेत्र - या क्षेत्रात  फिल्ड सुपरवायझर, गवंडी, सेंट्रिंग, प्लंबर, सुतारकाम, वायरमन अशी कामे करण्यासाठी कुशल असो किंवा अकुशल कामगार मिळत नसल्याची खंत या क्षेत्रात व्यक्त होऊ लागली आहे. जवळपास चार हजार नोकर्‍या या क्षेत्रात कुशल माणसांची वाट पाहत  आहेत. 

 वैद्यकीय सेवा - नर्स, वॉर्डबॉय आदींसाठी मागणीप्रमाणे  मनुष्यबळ उपलब्ध होताना दिसत नाही. यासह अ‍ॅम्ब्युलन्स चालक या पदासाठी चांगला पगार आणि सोयी-सुविधा असतानाही माणसे शोधावी लागत असल्याचे दिसते.