Thu, Jul 18, 2019 12:59



होमपेज › Kolhapur › प्रकाष आंबेडकर तुम्‍ही काडी करू नका : जितेंद्र आव्हाड(व्हिडिओ)

प्रकाष आंबेडकर तुम्‍ही काडी करू नका : जितेंद्र आव्हाड(व्हिडिओ)

Published On: Feb 05 2018 7:35PM | Last Updated: Feb 05 2018 7:35PM



कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोरेगाव-भीमा येथील २०० व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी  केला. तसेच या दंगलीचे सूत्रधार पुण्यातील समस्त हिंदु एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि सांगलीतील संभाजी भिडे गुरूजी आहेत. असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्‍यांच्या या वक्‍व्यानंतर राष्‍ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर, बहुजनांमध्ये एकी होत असताना तुम्‍ही मुद्दाम काडी करू नका अशी टीका केली आहे. 

जितेंद्र आवाड यांनी याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, ‘‘कोरेगाव-भीमा घटनेत मनुवाद्यांचा हात आहे हे सर्वात प्रथम राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्‍हटले आहे. आंबेडकरसाहेब आपण खूप मोठे नेते आहात, खूप विदवान आहात, खूप ज्ञानी आहात, हे सर्व आम्‍ही मान्य करू. मात्र, बहुजनांमध्ये एकी होत असताना तुम्‍ही मुद्दाम काडी करू नका. आपण लढत आहात आम्‍ही काहीच करत नाही असे समजू नका. तुम्‍ही आज संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांच्या विरोधात ओरडत आहात. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. गेल्‍या दहा वर्षापासून मी या दोघांविरोधात ओरडत आहे. तुम्‍ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात, हे नातं आमच्यासाठी खूप महत्‍वाचं आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप मानतात. तुम्‍ही निरर्थक वाद निर्माण करू नका. तुमच्या इशाऱ्यांना घाबरणारे आम्‍ही नाही. तुम्‍ही म्‍हणता मी तोंड उघडीन तर, आमची तोंडं काय बांधलेली नाहीत.’’

 दरम्‍यान, प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.