Sat, Feb 23, 2019 23:20होमपेज › Kolhapur › ‘जिजाऊ’ची अनाथांना मायेची ऊब : संयोगीताराजे

‘जिजाऊ’ची अनाथांना मायेची ऊब : संयोगीताराजे

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

अनाथपणाची झळ सोसणार्‍या मुलांना मायेची गरज आहे. त्यांना हक्‍काचे पालकत्व मिळावे, यासाठी जिजाऊ चळवळ सुरू करण्यात आली आहे. याला सर्वच घटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही चळवळ अधिक व्यापक बनविण्यासाठी सर्वांनी कर्तव्य भावनेतून पुढे यावे, असे आवाहन चळवळीच्या संकल्पक संयोगीताराजे छत्रपती यांनी केले. जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून बालकल्याण संकुल येथे शनिवारी सायंकाळी या चळवळीला शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते.

खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, या चळवळीच्या माध्यमातून नात्यातील नाळ जुळणे गरजेचे आहे. चळवळ यशस्वीपणे राबवण्याबरोबरच बालसंकुलातील अडचणी आणि गरजांची पूर्तता करण्याची ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली. 

माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने म्हणाले, समाजात  चांगुलपणा असणार्‍या माणसांची गरज आहे. जिजाऊंचे प्रेम फक्‍त शिवबांवर नव्हते, तर मावळ्यांवरही होते. यामुळेच स्वराज्य घडले. हाच वारसा चळवळीतून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज जाती-धर्माच्या लढाईत हरवलेले माणूसपण बालसंकुलात सापडते. आज समाज खर्‍या अर्थाने पोरका झाला आहे. तुमच्याकडून संस्कार, समभाव आणि माणसांतील माणुसकी शोधण्यासाठी आलो आहे. चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले. यावेळी बालकल्याण संकुल संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, आरती माने, पद्मजा तिवले, प्रियदर्शनी चोरगे, व्ही. बी. पाटील, नंदिनी परोडिया, निवेदिता घाटगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.