Fri, Nov 16, 2018 04:29होमपेज › Kolhapur › पोलिस असल्याची बतावणी करून भामट्यांनी दागिने लांबवले

पोलिस असल्याची बतावणी करून भामट्यांनी दागिने लांबवले

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिस असल्याची बतावणी करून राजोपाध्येनगरातील वृद्धाचे साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास करण्यात आले. शुक्रवारी राजोपाध्येनगरातील महादेव मंदिरनजीक ही घटना घडली. याबाबत वसंत परशराम चव्हाण (वय 67) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.  फिर्यादी वसंत चव्हाण प्राथमिक शिक्षण मंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी नातीच्या स्कूल बसची प्रतीक्षा करत ते राजोपाध्येनगरातील महादेव मंदिराजवळ थांबले होते. यावेळी दोन अनोखळी  त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने स्वत:जवळील पोलिसांचे ओळखपत्र दाखवले. आम्ही गांजा विकणार्‍यांना शोधतोय, तुम्ही गांजा विकत घेतला आहे का? अशी विचारणा त्यांनी चव्हाण यांना केली.

तसेच त्यांची अंगझडती घेतली. भागात चोर्‍या वाढल्या आहेत. तुमचे दागिने काढून रुमालात गुंडाळून ठेवा, असे त्या दोघांनी चव्हाण यांना बजावले. चव्हाण यांनी बोटातील 3 अंगठ्या व गळ्यातील सोनसाखळी असा ऐवज काढून एका रुमालात बांधला. चव्हाण यांच्या हातातील रुमाल घेऊन दोघे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी राजवाडा पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.