Mon, Apr 22, 2019 16:36होमपेज › Kolhapur › सांगलीची ‘तेरे मेरे सपने’ ठरली लक्षवेधी

सांगलीची ‘तेरे मेरे सपने’ ठरली लक्षवेधी

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 11:41PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

येथे सुरू असलेल्या राजर्षी शाहू राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी अभिनयाच्या जोरावर ‘तेरे मेरे सपने’ ही एकांकिका सर्वच द‍ृष्टीने लक्षवेधी ठरली. सांगलीच्या भगवती क्रिऐशनच्या कलाकारांनी सरस अभिनय केला. सामान्य माणूस, त्याची अगतिकता, समाज व्यवस्था अन् लाचारी, विचाराबद्दल चीड मात्र मोठे होण्याचे स्वप्न, त्यासाठीची  तळमळ या एकांकिकेतून दाखविण्यात आली. यश गडकरी व सौ. गडकरी यांचा अभिनय सरस होता. उत्कृष्ट, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीत यामुळे ही एकांकिका रसिकांना दाद देऊन गेली.

विवर, नाटकाला घट्ट मिठी मारताना, संदूक, सरफिर्‍या, अंधारकैद, फोबीया, डॉल्बी वाजली की धडधड, दी सीझ फायर या अन्य एकांकिका सादर झाल्या. मंथन कल्चरल अन् वेल्फेअर बेळगाव यांची ‘विवर’ एकांकिकेतून  दिसतं तसं नसतं या गोष्टीचा प्रत्यय दाखविण्यात आला. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. माणूस मात्र एकाच गोष्टीला चिकटून राहतो हेच या एकांकिकेचे सार होते. स्त्री कलाकारांनी अभिनय उठावदार केला. ‘नाटकाला घट्ट मिठी मारताना’ यातील आकाश थिटे (नट) व पायल खरटमोल यांचा अभिनय चांगला होता. समर्थ कलाविष्काराने  सादर केलेली ‘संदूक’ एकांकिकेचे नेपथ्य सुंदर होते. 

‘जिराफ थिएटर्स’ मुंबई यांच्या ‘सरफिर्‍या’ या एकांकिकेतून मोठ्या स्वप्नातून मोठे संकट माणसासमोर उभे रहाते. या संकटाला पार करणाराच यशस्वी होतो हे दाखविण्यात आले. हर्षल गठरी (सुनील) व केदार देसाई (सरफिर्‍या) यांचे अभिनय उत्तम होते. ‘तेरे मेरे सपने’ एकांकिकेचे नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्‍वसंगीत लक्षवेधी तर अभिनय सहजसुंदर लाजबाब होते. 

‘अंधारकैद’ या एकांकिकेत भास व आभासात उलगडत जाणारे आंधळ्याचे आयुष्य दाखविण्यात आले. संकेत मोडक यांचे दिग्दर्शन उत्कृष्ट ठरले. आंधळ्या अभिनयाने एकांकिका प्रेक्षकांना भावली. फोटो मंत्रा पुणेच्या कलाकारांनी एकांकिका सादर केली. माणसाच्या मनात एखाद्या घटनेमुळे ज्या जखमा होतात, त्याचे पडसाद भविष्यात उमटतात याचे विश्‍लेषण फोबीया या एकांकिकेने दाखविले. अ‍ॅडव्हेंचर प्रॉडक्शन कोल्हापूरने एकांकिका सादर केली. अपूर्वा चौधरी (ती) व अमर कुलकर्णी (तो) यांचा अभिनय सुंदर होता.

भारतीय शांती सेनेचे दोन जवान श्रीलंकेच्या जंगलात अडकून पडतात. त्यांच्या घालमेल आणि विरुद्ध मानसिकतेचे भाष्य म्हणजे ‘दी सीझ फायर’ या रूद्रेश्‍वर पणजी गोवा या एकांकिकेतून दाखविण्यात आले. या एकांकिकेचे नेपथ्य सूचक, प्रकाश योजन, अभिनय उत्तम होते.