Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Kolhapur › जयंती नाला पाईपलाईनचे काम पूर्णत्वास

जयंती नाला पाईपलाईनचे काम पूर्णत्वास

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:40PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या जयंती नाल्यातील सांडपाणी उपसा पाईपलाईनचे काम बुधवारी पूर्णत्वास आले. काही किरकोळ कामे शिल्‍लक असून ती गुरुवारी पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याने थेट पंचगंगेत जाणार्‍या सांडपाण्याची समस्या कायमची संपुष्टात आली आहे. 

शहरातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी जयंती नाला येथे संकलित केले जाते. तेथून ते पाणी उपसा करून कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेण्यात येते. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जयंती नाल्यातील ही पाईप नादुरुस्त झाली होती. त्यामुळे चार महिने मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिळसत आहे. सांडपाणी नदीत मिसळत असल्याच्या निषेधार्थ शहरातील विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन करून महापालिका प्रशासनास धारेवर धरले आहे. ही पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना क्रेन थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर कारवाई म्हणून महापालिकेचा वीजपुरवठा एक तास खंडित केला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दहा तारखेपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण करा, अन्यथा आयुक्‍तांवरच कारवाई करू, असा इशारा दिला होता. 

विभागीय आयुक्‍तांच्या इशार्‍यानंतर गेली दोन ते तीन दिवस महापालिका अधिकारी कर्मचार्‍यांनी अहोरात्र काम चालू ठेवले आहे. बुधवारी सकाळपर्यंत हे काम अंतिम टप्प्यात होते. बुधवारी दिवसभर शीघ्र गतीने काम करून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होता. बुधवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरूच होते. मात्र, काही किरकोळ कामे उरली असून ही कामे गुरुवारी सकाळी पूर्ण करून गुरुवारीच नव्याने बसविण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे सांडपाणी उचलण्याची चाचणी होण्याची शक्यता आहे. 

पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर जयंती नाल्यातून सांडपाणी थेट कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया के्ंरद्रात नेण्यात येणार आहे. त्यामुळे गेली चार महिने पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी कायमस्वरूपी बंद होणार आहे.