Fri, Jul 19, 2019 19:58होमपेज › Kolhapur › जरगनगरातील थरारनाट्य; पिस्तुलातून गोळीबार; पळवलेल्या सहकार्‍याची सुटका

टोळीयुद्धातून तरुणाचा खून : हल्लेखोर जेरबंद

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जरगनगर येथील ‘अण्णा ग्रुप कट्टा’ कॉर्नरवर पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून प्रतीक ऊर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय 27, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगाव) याचा अमानुष खून करण्यात आला. साथीदार सागर कांबळे यालाही पिस्तूलचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. हल्लेखोर प्रतीक सरनाईक याला सोमवारी सायंकाळी उचगाव उड्डाणपुलाजवळ जेरबंद करण्यात आले. गांधीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोवारचा सहकारी कांबळे याची सकाळी 11 वाजता सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा दावा केला जात असला, तरी ‘टोळीयुद्धा’तून थरारनाट्य घडल्याची चर्चा आहे. हल्लेखोर प्रतीक सुहास सरनाईक (वय 27, रा. साईनगर, पाचगाव) हा सराईत गुन्हेगार आहे. इचलकरंजीतील कुख्यात शस्त्रतस्कर टोळीशी त्याचे लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे.

जरगनगर-पाचगाव मार्गावर बाबा जरगनगर लेआऊट क्रमांक-4 अण्णा ग्रुप कट्ट्यालगत कॉर्नरवरील घटनेने जरगनगर, पाचगाव परिसरात तणावपूर्ण शांतता होती. मारेकर्‍याने दोन फुटावरून पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून पोवारचा खून केला. पाच वर्षांपासून धुमसणार्‍या वादाचा शेवट सूडचक्राने झाल्याने सन्‍नाटा होता.करवीर, गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी जरगनगर, पाचगाव, मंगळवार पेठ, गंगावेस, इचलकरंजीत छापे टाकून संशयितासह अपहृत सागर कांबळे याचा शोध घेतला. मात्र, सुगावा लागला नव्हता.

मारेकरी जेरबंद, अपहृत तरुणाकडे चौकशी

प्रतीक पोवार खूनप्रकरणी मारेकरी प्रतीक सरनाईकला गांधीनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उचगाव येथील ब्रीजजवळ सापळा रचून जेरबंद केले. मारेकर्‍याच्या शोधासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटकात पोलिसांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सरनाईक उचगाव येथील ब्रीजजवळ लपल्याची माहिती मिळताच उपअधीक्षक सूरज गुरव, गांधीनगरचे सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण व पथकाने सापळा रचला. त्यात संशयित सहिसलामत सापडला. त्याच्याकडून पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. अपहृत तरुण सागर कांबळेला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडेही चौकशी करण्यात येत आहे, असे गुरव यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पथकाचे अभिनंदन केले.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, मूळचे शिवाजी पेठ येथील पोवार कुटुंबीय पंधरा वर्षांपूर्वी पाचगाव येथील द्वारकानगरात स्थायिक झाले आहे. व्यवसायाने बागकाम करणारा प्रतीक व संशयित एकेकाळी जीवलग मित्र होते. जरगनगर येथील चौकात अण्णा ग्रुप कट्टा नावाने ग्रुपही तयार केला. रोज सायंकाळी सर्वच साथीदार एकत्रित येत, रात्री उशिरापर्यंत त्यांची बैठक चालायची.

प्रतीकला संपवूनच विषय कट होणार...

पाच वर्षांपूर्वी दोघांत मतभेद निर्माण झाले. एकमेकाला खुन्‍नस देण्यावरून त्यांच्यात खटके उडायचे. सहकारी मित्रांनी दोघांतील वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. शीघ्रकोपी असलेल्या सरनाईकने तडजोडीचा प्रयत्न प्रत्येकवेळी हाणून पाडला. प्रतीकला संपविल्याशिवाय विषय कट होणार नाही, असे तो सतत मित्राशी पुटपुटत होता.

कुख्यात शस्त्रतस्करी टोळीशी लागेबांधे

पोलिसांनी इचलकरंजीतील एका कुख्यात शस्त्रतस्करी टोळीविरुद्ध वर्षापूर्वी कारवाई केली, त्यात सरनाईकला अटक करून त्याच्या कब्जातून पिस्तूल हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यात सरनाईक काहीकाळ कारागृहात बंदिस्त होता. पाच महिन्यांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली होती.

रविवारी रात्री साडेदहाला पोवारचा मित्र गौरव सतीश वडेर (27, रा. पाचगाव) हा मित्र शुभमसमवेत अण्णा ग्रुप कट्ट्याजवळ बोलत थांबला होता. त्याचवेळी सरनाईक दुचाकीवरून आला. दहा-पंधरा मिनिटे त्यांच्यात चर्चा रंगली.  थोड्या वेळाने आपण परत येतो, असे सांगून सरनाईक निघून गेला. काही वेळाने प्रतीक पोवारने गौरवशी संपर्क साधून, तू कोठे आहेस, अशी विचारणा केली. अण्णा ग्रुप कट्ट्या वर थांबल्याची माहिती मिळताच पोवार मद्यधुंद अवस्थेत तेथे आला.

पोवार-सरनाईक यांच्यात झटापट

दरम्यानच्या काळात सरनाईक मद्यप्राशन करून कॉर्नरवर आला.  सिगारेट ओढत असतानाच त्याने कॉर्नरवर थांबलेल्या साथीदारांना  शिवीगाळ सुरू केली. सरनाईकने सागर कांबळे याला शिवीगाळ करून त्याची गळपट्टी धरली. त्यावेळी प्रतीक पोवार पुढे सरसावला. सागर कांबळे माझ्याबरोबर आला आहे, त्याला शिवीगाळ करू नकोस, असे सांगताच दोघांत वादावादी झाली. यावेळी झालेल्या झटापटीत पोवार याने सरनाईक याच्या शर्टची कॉलर पकडली. गौरवसह शुभम व अन्य मित्रांनी हस्तक्षेप केला.

प्रतीक भावा चुकलो...आता माफ कर!

प्रकरण हातघाईवर आल्याने सरनाईक कमालीचा संतापला होता. काही काळानंतर शांत होऊन सरनाईकने पोवारचा हात धरला. ‘चुकलो भावा... माफ कर, परत असे कधीच घडणार नाही’, असे स्पष्ट करीत दोन्ही हात जोडले. अन्य मित्रांकडेही त्याने दिलगिरी व्यक्‍त केली. माफीनाम्याने वादावर पडदा पडला, असाच सार्‍यांचा समज झाला.

...अन पिस्तुलातून थेट गोळ्या झाडल्या!

मित्रा-मित्रांतील दिलजमाईमुळे चर्चेचा नूर पालटला होता. पाच वर्षे धुमसणार्‍या वादावर सरनाईकने स्वत:च पडदा टाकल्याने सर्वांचे चेहरे फुलले होते. पाच, सहा मिनिटांनंतर सरनाईकने सार्‍यांना उद्देशून मी लघुशंकेला जाऊन येऊ का, अशी विचारणा केली. त्यावर गौरवनेही होकार दिला. दोन मिनिटांनंतर सरनाईक चारचौघांत मिसळला. काहीही न बोलता त्याने बर्म्युड्यात लपविलेले पिस्तूल काढले, अन् प्रतीक पोवार याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.

क्षणार्धात पोवार रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला...

गोळीबारामुळे मोठा आवाज झाला. त्याचक्षणी पोवार रक्‍तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. नेमके काय घडले? याविषयी सर्व जण अनभिज्ञ होते. जीवाच्या आकांताने सारेच पळत सुटले. पोवार रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच गौरव वडेर, शुभम पवार, सागर कांबळे भेदरलेल्या स्थितीत कॉर्नरजवळ आले. यावेळी सरनाईक हातातील पिस्तूल रोखून शिवीगाळ करीत होता.

मद्यधुंद मारेकर्‍याने पिस्तूल गौरव वडेरवर रोखले!

प्रतीक पोवार रस्त्यावर निपचित पडल्याचे निदर्शनास येताच गौरव वडेर पुढे सरसावला. त्यावर सरनाईकने शिवीगाळ केली. थांब तुलाही सोडत नाही, अशी धमकी देत हातातील पिस्तूल पुन्हा लोड करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला जमले नाही. भीतीने थरकाप उडालेल्या वडेरने तेथून धूम ठोकली. मारेकर्‍याने पिस्तूल रोखून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

सागर कांबळेवर दहशत दुचाकीवरून पळविले!

मारेकर्‍याने घटनास्थळी कमालीची दहशत माजविल्याने सागर कांबळे अण्णा ग्रुप कट्टा भिंतीआड अंधारात दडला होता. सरनाईकने त्याच्यावरही पिस्तूल उगारले. त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याच्यासह त्याने संभाजीनगरच्या दिशेने पलायन केले.

दोन तासांनंतर पोलिस घटनास्थळी!

रात्री साडेदहाच्या सुमाराला थरारनाट्य घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्ष, करवीर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, रात्री उशिरा साडेबारा वाजता पोलिस निरीक्षक दिलीप जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस पोहोचले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव दाखल झाले. त्यांनी मारेकर्‍यांची माहिती घेऊन ठिकठिकाणी पथके रवाना केली.

मृतदेह अडीच तास रस्त्यावरच

जरगनगर-पाचगाव रोडवर रात्री दहानंतर कमालीची सामसूम असते. मध्यवर्ती चौकात खुनाची घटना होऊनही परिसरातील नागरिकांना त्याची माहिती नव्हती. वाढदिवसानिमित्ताने फटाके फोडले असावेत, या शक्यतेने गोळीबाराच्या आवाजाची कोणीही फारशी दखल घेतली नव्हती. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत तसेच पंचनाम्याची प्रक्रिया संपेपर्यंत मृतदेह तीन तास रस्त्यावरच रक्‍ताच्या थारोळ्यात पडून होता.

हॉटेल व्यावसायिकावर पिस्तूल रोखले

पोवारचा खून करून पसार झालेल्या मारेकर्‍याने रात्री दीडच्या सुमाराला संभाजीनगर रोडवरील एका हॉटेल व्यावसायिकाकडे दारूची मागणी केली. नकार मिळताच मारेकर्‍याने संबंधित हॉटेल व्यावसायिकावर पिस्तूल रोखल्याची घटनास्थळी चर्चा होती.

प्रतीकच्या पत्नीसह,आई-वडिलांचा आक्रोश

बागकाम करणार्‍या प्रकाश पोवार यांनी मुलगा प्रतीकला कष्टाने वाढविले. त्यालाही बागकाम शिकवले. बापलेक बागकाम व अन्य कामे करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते. सात वर्षांपूर्वी विवाह झालेल्या प्रतीकला पाच व एक वर्षाची अशा दोन मुली आहेत. प्रतीकच्या खुनाची बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्‍काच बसला. पत्नी, आई, वडील कोसळलेच. पाच वषार्र्ंची चिमुरडीही मातेला बिलगून डोळ्यातून अश्रू ढाळत होती.

जरगनगर, पाचगावमध्ये सन्नाटा

पिस्तुलातून गोळ्या झाडून पाचगावमधील तरुणाचा खून झाल्याची बातमी पहाटेच्या सुमाराला जरगनगर, पाचगाव परिसरात वार्‍यासारखी पसरताच गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. चौकाचौकात गटागटाने दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र, माध्यमांशी भाष्य करण्यास टाळले जात होते.

मंगळवार पेठ परिसरात दिवसभर शोधमोहीम

मारेकर्‍याने मंगळवार पेठेत काही मित्रांकडे आश्रय घेतला असावा, असा संशय आहे. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, भरत पाटीलसह गुन्हे प्रगटीकरणाची टीम दिवसभर मंगळवार पेठेत शोध घेत होती. काही मित्रांसह नातेवाईकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे दिलीप जाधव यांनी सांगितले.

कंदलगावातील तिघांची नावे निष्पन्‍न

मारेकरी सरनाईककडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोवार खुनाच्या कटात कंदलगाव येथील तिघांची नावे निष्पन्‍न झाली आहेत. तिघेही सरनाईक याचे सहकारी आहेत. पोवारला ठार मारण्याच्या उद्देशाने सहकार्‍यांना हाताशी धरून त्याने कट रचला होता, असे तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी रात्री सांगितले. संशयितांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रात्री उशिरा विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.