अर्जुनवाड : वार्ताहर
अर्जुनवाड येथे कृष्णा नदीत सुमारे एक किलोमीटर जलपर्णी पसरल्याने नदीला जलप्रदूषणाचा विळखा बसला आहे. पाणी प्रवाहित नसल्याने जलपर्णीमुळे पाणी प्रदूषणाचा धोका वाढला आहे.
पंचगंगा नदीपाठोपाठ कृष्णा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालल्याचे नदीपात्रात पसरलेल्या जलपर्णीमुळे दिसत आहे. कृष्णा नदी ही बारमाही वाहत असते. उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर पाटबंधारे विभागाने म्हैशाळ बंधार्यात बरगे टाकून सध्या पाणी अडवले आहे. यामुळे नदीचा प्रवाह संथ गतीने होत असल्याने नदीपात्रात असलेली जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
अर्जुनवाड ते घालवाडपर्यंत जलपर्णी दिसत आहे. या जलपर्णीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने म्हैशाळ बंधार्याचे बरगे काढून नदी प्रवाहित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसे केल्यास जलपर्णी पुढे जाणार आहे.