Sun, May 26, 2019 12:41होमपेज › Kolhapur › गुळाचे दर न वाढल्यास आंदोलन

गुळाचे दर न वाढल्यास आंदोलन

Published On: Jan 05 2018 1:13AM | Last Updated: Jan 04 2018 8:45PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

गुळाच्या घसरलेल्या दराबाबत बाजार समितीमधील आयोजित बैठकीत गूळ उत्पादक शेतकर्‍यांनी तीव्र संताप केला. चार दिवसांत गुळाचे दर न वाढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी गुळाचा दर्जा तपासण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीमार्फत प्रयोगशाळा (लॅब) उभारली जाईल, असे  सभापती कृष्णात पाटील यांनी सांगितले. 

घसरलेल्या दराच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीतर्फे गूळ उत्पादकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. गुळाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या 3 हजार ते 3,200 रुपये असा गुळाला प्रतिक्‍विंटलला दर मिळत आहे. परिणामी, प्रतिक्‍विंटलला 800 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे गुळाला अनुदान मिळावे, अशी मागणी गूळ उत्पादक उत्तम पाटील यांनी केली. श्रीकांत घाटगे म्हणाले, सुरुवातीला चांगला दर द्यायचा, मध्यंतरी दर पाडायचा व हंगामाच्या शेवटी पुन्हा वाढवायचा.

असे किती दिवस चालायचे? घसरलेल्या दराबाबत समितीने काय केले? असे सवाल उपस्थित केले.  दादा पाटील यांनी गूळ उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती गेल्या महिन्यात पूर्णत: बिघडल्याचे सांगितले. बी. जी. पाटील यांनी कराडला प्रतिक्‍विंटल गुळाला 3,600 रुपये, मुंबईत 4,200 रुपये असा दर मिळत असताना कोल्हापुरात इतका दर कमी का, असा प्रश्‍न उपस्थित केला. शिवाजी पाटील यांनी कोल्हापूरच्या नावाखाली इतर ठिकाणचा गूळ विकणार्‍यांवर फौजदारी कारवाईची मागणी केली. सचिन पाटील यांनी साखरमिश्रित गुळावर बंदीची मागणी केली.  

जीआय मानांकनाच्या दर्जाचा गूळ, त्याची विक्री व्यवस्था, याबाबत 11 तारखेला बाजार समितीत बैठक होणार आहे. साखरेचा वापर करून तयार केलेला गूळ यामुळे कोल्हापुरी गुळाचे नाव बदनाम होत आहे. हा गूळ समिती आवारात येण्यास मनाई करावी, अशी मागणी बहुतांश  उत्पादकांनी केली. यावेळी संचालक विलास साठे, तानाजी आंग्रे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. 

काटे-पाटील यांच्यात खडाजंगी

गुळाच्या घसरलेल्या दराबाबत आपण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन अडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करू या, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केले. यावेळी गूळ उत्पादक संजय पाटील म्हणाले, मंत्र्यांकडे जाऊन दर वाढणार आहेत का ते सांगा. गेली दहा वर्षे तेच ते ऐकत आलो आहोत. या विषयावरून खडाजंगी झाली.