होमपेज › Kolhapur › गुळालाही प्रतिक्‍विंटल ४ हजार रुपये हमीभावाची आवश्यकता

गुळालाही प्रतिक्‍विंटल ४ हजार रुपये हमीभावाची आवश्यकता

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने भात, ज्वारी, मका, बाजरी, कापूस यासह 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली. उसाला एफआरपीनुसार दर मिळत आहे. यामुळे शेतकर्‍यांना चार पैसे जादा मिळणार आहेत. पण या पिकाबरोबरच कुटीर उद्योग असलेल्या असंघटित उद्योग असलेल्या शेतकर्‍यांनी तयार केलेल्या गुळालाही हमी भाव मिळावा, अशी मागणी आता गूळ उत्पादन शेतकर्‍यांमधून व्यक्‍त होऊ लागली आहे. 

यंदाच्या खरीप पिकांसाठी किंमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. मंगळवारी भात, ज्वारी, मका, बाजरी, कापूससह 14 पिकांच्या हमीभावात सरासरी 200 पासून 1200 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मागील संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या सरकारने केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा ही घसघसशीत केली होती. हाच फॉर्म्युला मोदी सरकारने वापरला आहे. आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून सरकारने पिकांचे हमीभाव वाढविले आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. गुळालाही  हमीभाव मिळण्याची आवश्यकता असून त्यासाठी राजकीय इच्छाशक्‍तीची गरज आहे.

देशात उत्तम प्रतिच्या गुळाची निर्मिती ही कोल्हापूर जिल्ह्यातच होते. येथील शेतकरी मेहनत घेऊन गुळाचे उत्पादन करतो. पण गुळाची वर्गवारी प्रक्रिया उद्योगात केल्यामुळे हमीभाव ठरविण्यासाठी अडचणी येत आहेत. पण सामान्य शेतकरीच हा गूळ तयार करत असल्यामुळे त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

 पारंपरिक व्यवसाय म्हणून गुळाचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. पण वाढती महागाई, मजुरीचे वाढलेले याचा विचार करता गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. भविष्यात जर गूळ उत्पादन टिकावयाचे असेल तर इतर पिकाप्रमाणे गुळालाही सरकारने 4000 रुपये हमी भाव देण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.