Tue, Jul 23, 2019 19:16होमपेज › Kolhapur › प्रस्थापितांना गॅझेटमध्ये धक्‍का बसणार का?

प्रस्थापितांना गॅझेटमध्ये धक्‍का बसणार का?

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:10AMकोल्हापूर : सतीश सरीकर

मे महिना आला की सर्वांचे लक्ष समर कॅम्प, फिरायला जाणे, एन्जॉय करणे आदीकडे लागते, पण पोलिसांचे लक्ष मात्र बदल्यांच्या गॅझेटकडे लागलेले असते. कारण पोलिसांच्याच भाषेत सांगायचे तर मे महिन्यात बदल्यांचे गॅझेट फुटणार असते. परिणामी त्यांचे ‘शरीर पोलिस ठाण्यात’ आणि ‘मन गॅझेटकडे’ लागलेले असते. ठराविक पोलिस गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी ‘ठाण’ मांडून आहेत. यात ‘कलेक्टर’ (कलेक्शन करणारे) व ‘प्रतिनियुक्‍तीवर’ (इतर ठिकाणी बदली होऊनही वरिष्ठांची मर्जी सांभाळणारे) असलेल्यांचा समावेश आहे. परिणामी ‘प्रस्थापितांना गॅझेटमध्ये धक्‍का बसणार का?’ अशी विचारणा सामान्य पोलिस कर्मचार्‍यातून होत आहे.  

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात सुमारे तीन हजारांवर अधिकारी, पोलिस कर्मचारी आहेत. जिल्ह्यात 32 पोलिस ठाणी असून दरवर्षी पोलिस कर्मचार्‍यांची जिल्ह्यांतर्गत बदल्या होत असतात. सुमारे 250 विनंती व सुमारे 500 प्रशासकीय बदल्यांचा त्यात समावेश असतो. शैक्षणिक व वैद्यकीय कारणास्तव विनंती बदल्या तर एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्षे झालेल्या पोलिसांची इतरत्र बदली केली जाते. एकदा नोकरी केलेल्या पोलिस ठाण्यात संबंधित पोलिसांची पुन्हा नियुक्‍ती करू नये, असा नियम आहे. मात्र, कलेक्टर व प्रतिनियुक्‍तीवर असलेल्यांसह काही पोलिसांना हा नियमच लागू नसल्याचे वास्तव आहे. दस्तुरखुद्द पोलिस मुख्यालयातच ‘रीडर ब्रँच’ला एक पोलिस गेली वीस वर्षे ठाण मांडून आहे. मग पोलिस दलातील एक कोणत्याही कर्मचारी ते काम करण्यास लायक नाही, असाच त्याचा अर्थ निघतो; परंतु संबंधित पोलिस सेवानिवृत्त झाल्यावर त्याचे टेबल बंद करणार का? असा प्रश्‍न पोलिस दलातून उपस्थित केला जात आहे. हे फक्‍त एक उदाहरण आहे.  

पोलिस दलात कागदपत्रे रंगवणार्‍यांना (गुन्हेविषयक कागदपत्रे तयार करणारे) फार महत्त्व आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी अशा कारकुनांना डिमांड होते. वरिष्ठ अधिकारी संबंधित कारकून आपल्या पोलिस ठाण्यातच रहावा यासाठी विशेष प्रयत्न करत होते; परंतु आता उलटे झाले आहे. पोलिसांच्यातही अक्षरशः ‘कोण जास्त मिळवून देतो’ यासाठी स्पर्धा लागत असते, अशी चर्चा आहे. त्यामुळे जास्त मिळवून देणार्‍या पोलिसालाच आपल्याकडे ठेवण्यात वरिष्ठही ‘धन्यता’ मानतात. विशेष म्हणजे त्यांनाच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या अहवालानुसार पोलिस दलातील मेडल मिळतात. सामान्य पोलिस बंदोबस्तातच मरतात. पोलिस दलात अनेक कर्मचारी प्रचंड हुशार आहेत. कोणतीही साधनसामुग्री नसताना केवळ हिमतींवर त्यांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत. हुशार पोलिसांचा तपासासाठी वापर आवश्यक आहे. जेणेकरून अनेक गुन्हे उघडकीस येतील. पोलिस दलाची प्रतिमा आणखी उजळण्यास मदत होईल. 

बदल्यांवर राजकीय दबावाची चर्चा

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील बदल्यावर सद्यस्थितीत मोठा ‘राजकीय दबाव’ असल्याची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधींनी बदल्यासाठी तीन पानी लिस्ट दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शहरातील लोकप्रतिनिधींनीही यादी दिल्याचे समजते. संबंधित लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार त्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्या बदल्या झाल्याशिवाय इतर बदल्यांना हात लावला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी ती लिस्ट पूर्ण होणार कधी? अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे. 

एलसीबीत अनेकांनी मांडलेय ठाण

एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) म्हणजे पोलिस दलाचे ‘कान आणि डोळे’ असे म्हटले जाते. विशेष म्हणजे एलसीबीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्हाभर असते. कुठल्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाऊन कधीही ते ‘थेट’ कारवाई करू शकतात. त्यामुळे जिल्हा पोलिस दलात ‘एलसीबीचा दरारा’ आहे. त्यामुळे या विभागाला त्या प्रमाणात गुन्हेगारी विश्‍वातून ‘पोहोच’ असल्याचे सांगण्यात येते. परिणामी या विभागात ‘वर्णी’ लागण्यासाठी अनेकांची धडपड असते. परंतु, सद्यस्थितीत काही पोलिस कर्मचारी गेले 15 ते 20 वर्षे कार्यरत आहेत. एखादे वर्ष ते बाहेर जाऊन येतात. अन्यथा एलसीबीमध्येच त्यांनी ठाण मांडल्याचे सांगण्यात येते. मोठ्या प्रमाणात ‘आर्थिक’ घडामोडी होत असल्याने अनेकांनी एलसीबीत नियुक्‍ती पाहिजे असते.