Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ठेकेदार काढतोय सांडपाण्यावर लोणी

ठेकेदार काढतोय सांडपाण्यावर लोणी

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:38PMकोल्हापूर ः सतीश सरीकर 

कोल्हापूर शहरातील सांडपाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी लाईन बझार परिसरात तब्बल 74 कोटींचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात आला; परंतु पहिल्यापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडला. अद्यापही पूर्ण क्षमतेने कधीच हा प्रकल्प सुरू झाला नाही. तरीही कागदोपत्री प्रकल्पात तब्बल 55 एम. एल. डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी अर्धवट प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यासाठी ठेकेदार कंपनीला वर्षाला सुमारे दोन कोटी दिले जात आहेत. सांडपाणी अधिभारातून नागरिकांकडून कररूपाने जमा केलेला पैसा महापालिका प्रशासन अशाप्रकारे ठेकेदारावर उधळत आहे. ‘पाण्यावर लोणी’ या म्हणीनुसार ठेकेदार कंपनी कोल्हापुरात ‘सांडपाण्यावर लोणी’ काढत आहे.

शहरातील विविध नाल्यांतून दररोज लाखो लिटर मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. परिणामी शहरातील नागरिकांसह पुढील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लाईन बझार येथे 76 एम.एल.डी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र बांधण्यात आले. त्यासाठी केंद्र शासनाकडून 70 टक्के निधी तर महापालिकेचा हिस्सा 30 टक्के होता. महापालिकेच्या तिजोरीत खणखणाट असल्याने ठेकेदाराला महापालिकेने 30 टक्के हिस्सा घालून प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले. नंतर ही रक्‍कम महापालिका प्रशासन हप्त्याने ठेकेदाराला देणार आहे. तसेच वर्षाला देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. 

महापालिकेच्या वतीने संबंधित ठेकेदार कंपनीला जानेवारी 2011 मध्ये 74 कोटींच्या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. जानेवारी 2013 पर्यंत काम पूर्ण करण्याची अट होती; परंतु हे काम पूर्ण झालेच नाही. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला अनेकवेळा महापालिकेने मुदत वाढवून दिली. त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे स्ट्रक्‍चर तयार झाले आहे; परंतु त्यातून जयंती नाल्यातून नेण्यात येणार्‍या सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. त्याबरोबरच इतरही अनेक कामे अपूर्ण आहेत. यात बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाले अडवून ते मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यासह इतर कामांचा समावेश आहे. त्यामुळे महाालिका प्रशासनाला न्यायालयीन बाबींसह राज्य शासन व विविध लवादांना तोंड द्यावे लागत आहे.  

जयंती नाला येथे 24 एम.एल.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे; परंतु हे केंद्र आता जुनाट झाले असून त्याची कार्यक्षमता संपलेली आहे. परिणामी येथून सांडपाणी उचलून पुढे सुमारे तीन किलोमीटर लांब असलेल्या लाईन बझार येथील सांडपाणी केंद्रात नेण्यात येत आहे. मात्र, लाईन बझारमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नाही. 55 एम. एल. डी. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरीही आकडेवारी फक्‍त कागदावरच आहे. सध्या पावसाळा असल्याने जयंती नाल्याच्या फळ्या काढल्या असल्याने मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्यामुळे लाईन बझार सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सद्यस्थितीत फक्‍त 15 एम.एल.डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होते. तसेच आता आणि यापूर्वीही सांडपाण्यावर अर्धवट प्रक्रिया केली जात आहे. त्याबाबत ठेकेदारालाही गांभीर्य नाही आणि महापालिका अधिकार्‍यांनाही त्याचे सोयरसूतक नसल्याचे वास्तव आहे. 

सांडपाणी अधिभाराच्या नावाखाली शहरवासीयांची लूट

महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे कोल्हापूर शहरातील 93 हजार नळ कनेक्शनधारक आहेत, तर 4 हजारांवर व्यापारी व औद्योगिक कनेक्शन आहेत. 0 ते 20 हजार लिटर पाणी वापरासाठी पाणी बिलाच्या 10 टक्के, 20 हजार ते 20 हजार लिटर वापर असणार्‍यांना 20 टक्के, 40 हजार लिटरच्या पुढे पाणी वापरणार्‍या व्यापार्‍यांना 35 टक्के व औद्योगिक असेल तर 40 टक्के सांडपाणी अधिभार पाणी बिलातून लावण्यात येतो. सांडपाणी प्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून अधिभार लावण्यात आला होता; परंतु प्रकल्प बंद आहे. मात्र, महापालिकेची वसुली सुरूच आहे. वर्षाला सुमारे आठ कोटीहून जास्त रक्‍कम सांडपाणी अधिभारातून महापालिका तिजोरीत जमा होते. शहरातील सांडपाण्याची अद्यापही योग्य विल्हेवाट लावली जात नाही. मग शहरवासीयांवर सांडपाणी अधिभाराचा भुर्दंड लावलाच का? अशी विचारणा होत आहे. 

पंचगंगा-जयंती नाला थेट भेट!

कोल्हापूर शहरात रोज सुमारे 93 एम.एल.डी. सांडपाणी तयार होते. त्यात तब्बल 68 एम.एल.डी. सांडपाणी हे मैलामिश्रित असते. शहरातील जयंती, दुधाळीसह लक्षतीर्थ, जामदार क्‍लब, सिद्धार्थनगर, सीपीआर, राजहंस प्रेस, रमण मळा, ड्रीम वर्ल्ड, लाईन बझार व बापट कॅम्प आदी बारा नाल्यातून हे सांडपाणी वाहते. यापैकी सर्वाधिक मोठा नाला जयंती असून तेथे महापालिकेची यंत्रणा आहे. मात्र, वर्षातील बहुतांश दिवस ती बंद असते. आता तर पावसाळ्यात सांडपाणी थेट पंचगंगेत सोडले आहे.