Thu, Apr 25, 2019 04:02होमपेज › Kolhapur › शहरात सात-बारांचे होणार प्रॉपर्टी कार्ड

शहरात सात-बारांचे होणार प्रॉपर्टी कार्ड

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:50PMकोल्हापूर : अनिल देशमुख

शहरात असूनही सात-बारा मिळत असलेल्या मिळकतधारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) मिळणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी नगरभूमापन आणि प्रांताधिकारी कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

कोल्हापूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेती म्हणून वापर केल्या जाणार्‍या जमिनी विकसित केल्या जात आहेत. या जमिनींवर निवासी वसाहती, कॉलन्या वसल्या आहेत. त्यासाठी या शेतीच्या जमिनींचे रूपांतर बिनशेतीतही झाले आहे. मात्र, त्यावर उभारलेल्या मिळकतींचे अद्याप प्रॉपर्टी कार्ड झालेले नाही. शहरात सुमारे 33 हजार सात-बारा आहेत. यापैकी काही सात-बारांचे प्रॉपर्टी कार्ड झाले आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

शहरातील मिळकतींचे जे सात-बारा बिनशेती झाले आहेत, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत. त्यानुसार करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, नगरभूमापन अधिकारी किरण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पायलट प्रोजक्ट म्हणून तातडीने हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माहिती संकलनाचे कामही नगरभूमापन कार्यालयाकडून सुरू करण्यात आले आहे.

काही मिळकतींचे सात-बाराही आहेत आणि प्रॉपर्टी कार्डही आहेत. प्रॉपर्टी कार्डवर नोंदी नाहीत, तर सात-बारांना नोंदी केेल्या जात आहेत. अनेक ठिकाणी जमीन बिनशेती करून ती विकसित केली जाते. मात्र, विकसक त्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड करत नाहीत. याउलट प्रत्येक मिळकतधारक स्वत:पुरते प्रॉपर्टी कार्ड करून घेत असतात. 

मात्र, अनेकदा विकसकाने रस्ते, पायाभूत सुविधांसाठी सोडलेल्या जागेचा प्रश्‍न निर्माण होतो. यामुळे सात-बारावरील क्षेत्र आणि प्रॉपर्टी कार्डचे क्षेत्र जुळवताना अडचणी निर्माण होत असल्याने प्रॉपर्टी कार्डचे काम रेंगाळले होते. मात्र, हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने शहरातील सात-बारा मिळकतधारकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळण्याची शक्यता आहे.