Thu, May 23, 2019 21:22
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › रेडं मुसळी तांदळाच्या वाणास तत्काळ पेटंट घेण्याची गरज

रेडं मुसळी तांदळाच्या वाणास तत्काळ पेटंट घेण्याची गरज

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 1:10AMकोल्हापूर : विजय पाटील

गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या जंगलानजीकच्या परिसरात रेडंं मुसळी नावाच्या औषधी गुणधर्म असणार्‍या तांदळाचे पेटंट तत्काळ घेण्याची गरज आहे. वन विभागाच्या पुढाकाराने या तांदळाची ‘वनामृत’ या ब्रँडखाली स्थानिक शेतकर्‍यांकडून विक्री केली जाते. या तांदळामधील वैशिष्ट्ये दुर्मीळ आणि आरोग्यदायी असल्याने, याबाबत वन विभागाने जीआय (भौगोलिक  मानांकन) घेण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.पश्‍चिम घाटाला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. 

पश्‍चिम घाटमाथ्याच्या याच परिसरात बोरबेट या जंगलव्याप्त गाव परिसरात ‘रेडं मुसळी’ या तांदळाचे पीक शेकडो वर्षांपासून स्थानिक शेतकर्‍यांकडून घेतले जाते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जंगलांचे संवर्धन करण्याच्या हेतूने वन विभागाने रोजगारासाठी नवे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमामुळे या तांदळाची ओळख वन विभागाला झाली. हा तांदूळ दुसरीकडे कोणत्याही प्रदेशात आढळत नसल्याचे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे. या तांदळात माणसाची प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झाले. त्यामुळेच वन विभागाने या तांदळाची विक्री ‘वनामृत’ या ब्रँडखाली नुकतीच सुरू केली आहे. बोरबेट सोडले, तर हे तांदूळ जिल्ह्यातील इतर भागातही कुणाला माहीत नाहीत. या गावातील पाहुणेसुद्धा माणूस आजारी पडला, तर या तांदळाची पेज त्याला देशी औषध म्हणून पाजतात. त्यामुळे हे तांदूळ पाहुण्यांना भेट म्हणून दिली जाण्याची पद्धत आहे.

आम्ही स्थानिकांकडून घेतलेल्या माहितीत या तांदळात आरोग्यासाठी आवश्यक पौष्टिक गुण असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पश्‍चिम घाट अ‍ॅग्रो-फॉरेस्ट प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश फोंडे यांनी सांगितले.

औषधी आणि पौष्टिक गुणधर्म 

या तांदळात असणार्‍या गुणधर्माचा अभ्यास शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रा. एन. बी. गायकवाड यांच्याकडून सुरू आहे. त्यांनी स्थानिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले आहे की, ग्रामस्थ जर आजारी पडले, तर आम्ही रेडं मुसळी तांदळाची पेज देतो. ही पेज रुग्णाला दिली, तर तो लवकर बरा होतो. अनेक वर्षांपासून आजारी माणसाला औषध म्हणून या तांदळाची पेज दिली जाते. याचाच अर्थ प्रतिकारशक्ती वाढवण्यासारखे गुणधर्म यामध्ये असण्याची शक्यता असल्याचे डॉ. गायकवाड यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितली. आम्ही या तांदळाचे पृथक्करण सुरू केले आहे. शास्त्रीय पृथक्करणानंतर यामध्ये असणार्‍या गुणधर्माची अधिक माहिती मिळू शकणार आहे, असे त्यांनी सांगितले.