Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › पाकमधून आयात होणार्‍या साखरेच्या मुसक्या बांधल्या?

पाकमधून आयात होणार्‍या साखरेच्या मुसक्या बांधल्या?

Published On: Jan 11 2018 9:18AM | Last Updated: Jan 11 2018 9:18AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः राजेंद्र जोशी

भारतीय साखर उद्योगात कोसळत्या भावामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानातून साखर आयातीच्या अफवा उठत असल्या, तरी केंद्र सरकारने या आयातीच्या मुसक्या बांधण्याची पूर्ण तयारी केली आहे. भारतातील साखर उद्योगाला धक्का बसेल, अशा स्थितीत पाकिस्तानातून साखर आयातच होणार नाही, अशा पद्धतीने आयात शुल्क निर्धारित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. यामुळे भारतीय साखर उद्योगाला तूर्त तरी साखर आयातीचे कोणतेही भय नाही, असा निर्वाळा भारतीय साखर कारखाने महासंघाने (इस्मा) दिला आहे.

भारतात सध्या साखरेवर 50 टक्के इतके आयात शुल्क आकारले जाते आहे. पाकिस्तानातून या दराने आयात झाली, तर देशांतर्गत बाजारातील दरापेक्षा जादा दरानेच साखर उपलब्ध होऊ शकते. हा व्यवहारही किफायतशीर नाही. तथापि, पाकिस्तानातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्यासाठी तेथील सरकारने मोठे अनुदान जाहीर केले आहे. 

यामध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांत आघाडीवर आहे. जागतिक बाजारात साखरेचे दर खालच्या पातळीवर असल्याने पाकिस्तानला भारत हीच आश्‍वासक बाजारपेठ उपलब्ध आहे. यामुळेच पाकिस्तानातून भारतात साखर निर्यातीच्या कुरघोड्या सुरू झाल्या असल्या, तरी ही साखर भारतात उतरलीच जाणार नाही, अशारीतीने वाढीव आयात शुल्काद्वारे मुसक्या बांधण्याचे काम वाणिज्य मंत्रालयात सुरू झाले आहे. देशात साखरेच्या चालू हंगामात 251 लाख मे. टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे आणि गतवर्षीचा 42 लाख मे. टन साखरेचा प्रारंभीचा साठा लक्षात घेता 2018-19 या हंगामापूर्वी साधारण 40 लाख मे. टन साखर शिल्लक असेल.