Tue, Jul 23, 2019 06:25होमपेज › Kolhapur › पदाधिकारी बदलाचा मुहूर्त टळला

पदाधिकारी बदलाचा मुहूर्त टळला

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 02 2018 1:55AMकोल्हापूर : विकास कांबळे

सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदलाचा मुहूर्त 1 जून ठरला होता. त्यामुळे सर्व सदस्यांचे लक्ष पदाधिकार्‍यांच्या राजीनाम्याकडे लागले होते; मात्र पदाधिकारी बदलाचा आजचा मुहूर्त वाया गेला. त्यामुळे पुढच्या मुहूर्ताकडे आता सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष परदेश दौर्‍यावर गेल्या असल्याने त्या आल्यानंतरच आता पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत यावेळी स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही. मात्र, आजपर्यंत एक सदस्य निवडून आणताना पुरेवाट होणार्‍या भाजपने सर्वाधिक जागा निवडून आणण्यात यश मिळविले. काँग्रेसइतक्याच भाजपनेही आपले उमेदवार निवडून आणले. लोकसभा निवडणुकीनंतर फिरलेल्या राजकारणाने महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आले; पण त्याचबरोबर त्यांनी स्थानिक संस्थांवरही आपला झेंडा फडकविण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप आघाडी दोघांनाही संधी होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तेसाठी नेहमी बेरजेचे राजकारण करणारे अनुभवी नेते असतानाही त्यांना जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करता आली नाही. उलट भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्वांची मोट बांधण्यास यश मिळविले. मात्र, हे करत असताना भाजपला महाडिक गट, माजी मंत्री विनय कोरे, आवाडे गट आणि शिवसेना यांची चांगली साथ मिळाली. ताराराणी आघाडी, जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड विकास आघाडी यांना सोबत घेत असताना भाजपने या सर्वांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या नेत्यांना केवळ जि. प. अध्यक्षपदामध्ये रस होता.  भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेला अध्यक्ष त्यांना करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी फक्त अध्यक्षपदच आपल्याकडे ठेवले आणि बाकी सर्व पदे इतर पक्षांना व आघाड्यांना दिली.

जि. प. अध्यक्षपद खुले होते. त्यामुळे या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी पदाधिकारी निवड करत असताना सव्वा वर्षाचा कार्यकाल निश्‍चित करण्यात आला होता. सव्वा वर्षाचा कार्यकाल संपत आल्यानंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाली. खुर्चीवर बसेपर्यंत नेते सांगतील तेव्हा राजीनामा देऊ, असे म्हणणारे कार्यकाल संपत आला की पळून खेळू लागतात. त्यावेळी नेत्यांमध्ये जी चर्चा झाली, त्यामध्ये पदाधिकारी बदलाचा 1 जून मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. त्यामुळे कालपासून याची चर्चा सुरू झाली होती. 

सभापतींना राजीनामे द्यावयाचे झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्षांकडे त्यांना राजीनामा द्यावा लागतो. मात्र, अध्यक्ष परदेश दौर्‍यावर गेल्या असल्यामुळे त्या आठ ते दहा दिवस येणार नाहीत. त्यामुळे राजीनामे कोणाकडे द्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा आजचा मुहूर्त वाया गेला.

आवाडे गटामुळे समितीमध्ये बदल शक्य
सत्ता स्थापन करीत असताना बांधकाम व समाजकल्याण समिती जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. उपाध्यक्ष व शिक्षण समिती शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे या दोन पदांबाबतचा निर्णय या पक्षाचे नेते घेतील. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाला मात्र वाटेकरी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाला हे पद आहे. त्यामुळे आवाडे गटाने विद्यमान सभापतींच्या राजीनाम्यासाठी उचल खाल्ली असल्याने या समितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.