Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Kolhapur › काठीला सोने बांधून फिरण्याचा गेला काळ

काठीला सोने बांधून फिरण्याचा गेला काळ

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 11:51PMकोल्हापूर : विजय पाटील 

काठीला सोनं बांधून तीर्थयात्रा करण्याचा एक काळ होता; पण आता तो काळ केव्हाच सरला. आता खिशातील पाकीट केव्हा लंपास झाले ते कळत नाही आणि दुसर्‍या बाजूला हॅकर्सकडून बँक खात्यावरील रक्कम परस्पर केव्हा ट्रान्स्फर होईल, याची शाश्‍वती नाही. अशा काळात किलोभर सोनं घेऊन कोणी जात असेल तर त्याच्या सुरक्षिततेची ऐशी-तैशी होऊ शकते, हे नुकत्याच गुजरीत झालेल्या चोरी प्रकरणातून समोर आले.  

मुंबई हे सोन्याचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी दागिन्यांची ऑर्डर टक्केवारीवर मुंबईतील नेहमीच्या व्यापार्‍यांना देतात. तुलनेने स्वस्त आणि लवकर दागिने मुंबईतून तयार होऊन मिळतात. त्यामुळे अनेक व्यापारी बहुतेक ऑर्डर मुंबईतील ओळखीच्या व्यापार्‍यांना देतात. ऑर्डर दिलेले दागिने घेऊन येणार्‍या व्यापार्‍यांचा कोल्हापुरात येण्याचा दिवस ठरलेला असतो. त्यांचा दिवस ठरलेला असल्यामुळे दागिने मिळण्याचा आणि हिशेब करण्याचे नियोजन सराफांचे निश्‍चित असते. कांतीलाल मेहता हा सराफ  अनेक वर्षांपासून ऑर्डर घेऊन एकटाच येतो. त्याच्याकडे ऑर्डर्स चांगल्या असल्याने दरवेळी किलो-दोन किलो सोने हमखास असते ,असाही बोलबाला होता. साहजिकच मेहता यांची माहिती सहज मिळाली असल्याने कोणीतरी साज हेरून टीप दिली, हे उघड आहे. या टीपच्या आधाराने मग त्यांचा पाठलाग करत तरुणांच्या टोळीने त्यांना भल्या सकाळी मारहाण करून लुटले. मूळ घटना अशी असली तरी कोल्हापुरातील सोन्याच्या बाजारपेठेत लूट होेते, हे गंभीर प्रकरण आहे. कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा कसा फज्जा उडाला आहे याचे हे बोलके उदाहरण आहे. सीसीटीव्ही जागोजागी आहेत.  पोलिसांची चौकी हाकेच्या अंतरावर दिसते. आणि  माणसांची ये-जा असणारा हा परिसर असूनही थेट फिल्मी स्टाईलने चोरी करण्याचे धाडस कोल्हापुरातील गुन्हेगारी वाढली असल्याचा पुरावा आहे. पोलिसांना गुन्हेगारांनी दिलेले हे ओपन चॅलेंज आहे. दुसर्‍या बाजूला सतरा लाखांची रोख रकमेची बॅग आणि आता सोने लुटीच्या घटनांची मालिका पाहता सावधगिरी पाळण्याची गरजही निर्माण झाली आहे. मोठ्या रकमा आणि किमती वस्तू नेताना एकटे-दुकटे प्रवास करणे जीवाचीसुद्धा रिस्क आहे. हे आता लक्ष्यात घेण्याची गरज आहे. मला कोण काय करतोय? मी अनेक वर्षे अशा पद्धतीनेच व्यवहार करतोय? असा फुकाचा गर्व आता सोडायला हवा. किमान ज्या भागात किमती वस्तू पोहोचवणार आहे त्या स्थानिक पोलिसांना किमान पूर्वसूचना दिली तरी संभाव्य धोका टळू शकतो. दुसर्‍या बाजूला एकटे जाण्याऐवजी कोणीतरी सोबत असेल तरीही लुटीसारख्या घटनांना किमान आळा बसू शकतो. 

पूर्वी काठीला सोने बांधून फिरण्याचा काळ होता. आता नुसती काठी घेऊन फिरणार्‍यांची काठीसुद्धा कोणीतरी चोरून नेईल, असा काळ आहे लक्षात घ्यायला हवे. याचा अर्थ व्यवहार करणार्‍यांनी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करायला हव्यात. तसेच व्यवहरांची माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करावा, इतकाच या क्षेत्रातील जुन्याजाणत्यांचा मोलाचा सल्ला आहे. 

सोशल मीडिया कळीचा मुद्दा 
लुटीच्या घटनांमध्ये आता सराईत गुन्हेगारच असतात असे नाही. अनेक नवखी आणि रेकॉर्ड नसलेले तरुण यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जागांची रेकी करून तसे व्हिडीओ सहजपणे एकमेकांना पाठवले जातात. या व्हिडीओचा अभ्यास करून नियोजन केले जाते. या अभ्यासात वर्दळ कुठे आहे, सीसीटीव्ही कोणत्या ठिकाणी लावले आहेत तसेच पसार होण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते आहेत, याची माहिती कमी वेळात मिळवता येते. त्यामुळे लुटीसारख्या घटनांमध्ये वेगवेगळ्या शहरातील मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून कट करून गुन्हे करण्याचा नवा ट्रेंड दिसू लागला आहे.