Sun, Apr 21, 2019 00:31होमपेज › Kolhapur › 'पुढारी'च्या 'ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण'ला प्रारंभ (Video)

'पुढारी'च्या 'ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण'ला प्रारंभ (Video)

Published On: Jan 10 2018 9:07PM | Last Updated: Jan 10 2018 9:32PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

समाजामध्ये महिला सबलीकरण व्हावे आणि महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, या उद्देशाने दैनिक पुढारीच्या प्रयोग फौंडेशनतर्फे 'ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ पेटाळा परिसरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर आज झाला. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी प्रमुख पाहुणे होते. न्यू एज्यूकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया आणि नितीन वाडीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी सुहास ठोंबरे मर्दानी आखाड्याच्या वतीने शिवकालीन युद्ध कलेची तसेच न्यू ज्युदो कराटे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आत्मसंरक्षण तंत्राची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या समारंभामध्ये आंतराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू अनुजा पाटील तसेच विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांक पटकावलेल्या प्राची भिवसे, आंतराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने, खेलो इंडियासाठी निवड झालेली मानसी पाटील यांना गौरविण्यात आले. 

या वेळी 'पुढारी'चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत माहिती दिली. डॉ. जाधव म्हणाले, 'पुढारी जनतेचा आवाज बनला आहे. पुढारीच्या हाकेला जनतेची नेहमीच साथ मिळाली आहे. त्यातूनच आज पुढारी रस्त्यावर उतरून जनतेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. महिला सक्षमीकरण, सबलीकरण असे शब्द कानावर पडत असतात. मात्र, त्याबाबत काही घडताना दिसत नाही, याची सर्वांनाच खंत आहे.’ या उपक्रमाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचे नवी चळवळ सुरू करत आहोत. त्याला साथ देत हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले,  

‘पुढारी’ने स्त्री सबलीकरणाचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमा अंतर्गत शाळकरी मुली, महिलांसाठी स्वसंरक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. दर शनिवारी दोन तास असे दोन महिन्यांचे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. यात सहभागी होणार्‍यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. यासह महिलांच्या सर्वागीण विकासासाठी अन्य उपक्रमही राबविले जात असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, 'महाराणी ताराराणीपासून आजपर्यंत विविध क्षेत्रांत महिलांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. काळानुसार महिलांना आत्मसंरक्षनाची गरज आहे. पुढारी नेहमीच सामाजिक दृष्टीकोणातून उपक्रम राबवत असतो. पुढारीच्या माध्यमातून समाज हिताचे कार्य असेच चालू राहील.' आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'प्रत्येकात एक प्रचंड ऊर्जा असते, तिला योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. स्वत:च्या  संरक्षणासाठी  मुली आणि महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे सांगत त्यांनी  या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महानगरपलिकेच्या  सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवावा.' या उपक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ज्युदो  कराटेचे दोन महिन्यांचे  मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समाजातील सर्वच स्तरांतील महिलांना आणि युवतींना स्वरक्षण करता यावे तसेच भक्कमपणे लढण्याचे तंत्र आणि मानसिक बळ मिळावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.