Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Kolhapur › ऊस तोडणीसाठी मजुरांकडून शेतकर्‍यांची लूट

ऊस तोडणीसाठी मजुरांकडून शेतकर्‍यांची लूट

Published On: Mar 15 2018 11:35PM | Last Updated: Mar 15 2018 11:35PMकुडित्रे : प्रा.एम. टी. शेलार 

साखर कारखान्यांचे गळित हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. एफ.आर.पी. अधिक 100 रुपये ऊस तुटल्यावर व 100 रुपये महिन्यानंतर या स्वयंघोषित फॉर्म्यूल्याला तिलांजली देत 2500 रूपयांप्रमाणे उचल तीही ऊस तुटल्यानंतर महिन्याच्या पुढे दिली जात आहे. त्यातच अखेरच्या टप्प्यात ऊस तोडणी व वाहतूकदारांनी थेट खंडणीस्वरूप पैसे मागायला सुरवात केली आहे. साखर कारखानेदेखील हतबल झाल्यामुळे अडलेल्या शेतकर्‍याला फडकर्‍यांचे पाय धरण्याचे वेळ आली आहे.

बुडवून खायाच कुठायं?

2012 च्या करारानुसार तोडणी मजुरांनी शेतकर्‍याच्या उसाची प्लॉटपासून 100 मीटर उसाची वाहतूक करायची अट आहे. तसेच उसाचे 50 टक्के वाडे ऊस उत्पादकाला देण्याची अट आहे. चहा, नाष्टा, जेवण असा मोबदला शेतकर्‍याकडे मागायचा नाही. तोडणी तळाबरोबर करायची, शेताची चिखला चिखल करायची नाही. त्याचबरोबर वाहनाच्या ड्रायव्हरच्या जेवणाची, चहापाण्याची सोय वाहन मालकाने करायची; पण यातील एकही अट पाळली जात नाही. ऊस मालकाला त्याच्याच उसाचे वाडे विकत घ्यावे लागते.

ऊस प्लॉटच्या बाहेर काढायची अट सोडाच; पण प्रत्येक पातेला (चार सर्‍यांची एक पात) गाडी लागली पाहिजे तरच उसाला कोयता लावणार ही अट. फडात ट्रक, ट्रॅक्टर गाडी जात असली तरी साडग्याला 2000 रुपये, ट्रकला 1500 रुपये आणि गाडीला 400 रुपये हा खंडणीचा दर फिक्स झाला आहे. शिवाय ट्रक / ट्रॅक्टर ड्रायव्हरला दोन वेळचा जेवणाचा डबा, किंवा खेपेला 100 रुपये जेवणाला आणि 100 रुपये  एंट्री  हा खंडणीचा नवा प्रकार. शिवाय प्लॉट संपण्यापूर्वी  प्रोग्राम (मटण, दारू, तांदूळ चटणी मसाला) द्यावा लागतो. चिटबॉय ओव्हरसिअर, शेती अधिकारी यांच्याकडे तक्रार करायची सोय नाही. करा जावा की काय तरी तडजोड  हा समजुतीचा तह करण्याचा सल्ला. कारण तेही हतबल. बिचारा ऊस उत्पादक मड्याप्रमाणे ऊस शेतात ठेवता येत नाही म्हणून मुकाट्याने हा अन्याय सहन करतो.

ऊस लावायला नव्हे घालवायला शिका?

उसाचा तोडणीचा दर प्रतिटन 228 रुपये त्यावर 18.50 टक्के मुकादम कमिशन मिळून प्रतिटन 270 रुपये 18 पैसे झाला आहे. एक गडी दिवसाला 2 टन ऊस सोलून तयार करतो म्हणजे चार तासांत सुमारे 540 रुपये मजुरी पडते. ऊस उत्पादकाला 18 महिने राबून टनाला तेवढही मिळत नाही. गड्याला खेपेमागे वाड्याचे 200 रुपये मिळतात. म्हणूनच कारखाना कार्यस्थळावर व महत्त्वाच्या तिट्ट्यावर हंगामात वाड्याचा बाजार विकसित होत आहे.