Sat, Apr 20, 2019 08:20होमपेज › Kolhapur › आगीमुळे गवत, काजूचे नुकसान

आगीमुळे गवत, काजूचे नुकसान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आजरा : वार्ताहर

सोहाळे, पारेवाडी या ठिकाणी लागलेल्या आगीत गवत, काजूसह अन्य जातींच्या झाडांचे नुकसान झाले. दुपारच्या सत्रात आग लागल्याने काही वेळातच दूरवर क्षेत्राला वेढा घालत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सोहाळे येथील डोंगर परिसर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धुमसत होता. काल सायंकाळच्यावेळी डोंगर परिसरातून हा वणवा खासगी क्षेत्रात आला. दरम्यान, यामध्ये डोंगरालगत असलेल्या राजेंद्र दोरूगडे यांचे गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर लागूनच असलेले राजेंद्र देसाई यासह अन्य शेतकर्‍यांच्या काजूच्या झाडांना आगीची झळ बसली. त्यामुळे काजूच्या झाडांचेही नुकसान झाले आहे.

पारेवाडी व पेठेवाडी दरम्यान परिसरात लागलेल्या आगीमध्ये काजूबाग व गवत जळाले. आजरा-आंबोली मार्गालगत एमआयडीसीच्या पुढील बाजूस असलेल्या पारेवाडी-पेठेवाडी गावच्या हद्दीकडून लागलेली आग कुंभार यांच्या शेतापर्यंत पसरली. यामध्ये बिपीन परळकर यांचे 10 हजारांचे गवत व काजूच्या झाडांचे नुकसान झाले. तर जोतिबा कुंभार यांचेही नुकसान झाले आहे. साधारणतः 25 ते 30 एकर परिसरात ही आग पसरली होती. आग लागल्याची माहिती समजताच परिसरातील शेतकर्‍यांनी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. 

आगीचा फटका रस्त्याशेजारील झाडांनाही बसू लागला आहे. सोमवारी रात्री आजरा-गडहिंग्लज मार्गावरील व्हिक्टोरिया पुलानजीक असणार्‍या उभ्या वटवृक्षाने पेट घेतला. सदरचे वृत्त वनपाल ए. डी. राऊत यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या सत्रामुळे तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे. तर जंगली प्राण्यांचा जंगलाशेजारी शेती व नागरिवस्त्यांना उपद्रव सुरू झाला आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Sohale, Parewadi, grass,  cashew nuts,  damaged, fire


  •