Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › नियमबाह्य नंबरप्लेटवाल्यांची मानसिकता बदलेना

नियमबाह्य नंबरप्लेटवाल्यांची मानसिकता बदलेना

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 9:45PMकोल्हापूर : गौरव डोंगरे

पोलिसांकडून वारंवार होणार्‍या दंडात्मक कारवाईलाही न जुमानता अशा फॅन्सी नंबरप्लेटवाल्यांची मुजोरी सुरूच आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांची नजर चुकवून अनेकजण शहरात बेभानपणे वाहने चालवत आहेत. मोटारसायकलच्या नंबरप्लेटद्वारे ‘कलादर्शन’ (?) करणार्‍यांची संख्या शहरात वाढलेली आहे. 

चेन स्नॅचिंग, वाटमारी, मारामारीच्या घटनांत विनानंबरप्लेटची वाहने वापरली जातात. तसेच सिग्‍नल जम्पसह इतर वाहतूक नियमांचे उल्‍लंघन अतिउत्साही तरुणांकडून होते. या तरुणांकडे असणार्‍या वाहनांच्या नंबरप्लेट अनेकदा फॅन्सी असतात. परिवहन विभागाच्या नियमांना डावलून अशा नंबरप्लेट बनविल्या जातात. पांढरी नंबरप्लेट आणि काळ्या रंगात ठराविक साईजचे अंक, अक्षरे काढावीत याविषयी नियम आहे. मात्र, खुलेआम हा नियम पायदळी तुडवून नंबरप्लेट बनवून घेतल्या जातात. 

मानसिकता बदलेना
फॅन्सी नंबरप्लेटद्वारे ‘दादा’, ‘बॉस’, ‘नाना’, ‘मामा’, ‘एसटी’, ‘अशा अक्षरांचे स्वरूप दिले जाते. काही वेळा हौस तर अनेकदा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने बनविण्यात येतात. अशांवर केवळ दंडात्मक कारवाईचा फरकही जाणवत नाही. त्यामुळे मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

दुकानदारांवर कारवाई कधी?
नियमबाह्य नंबरप्लेट बनविणार्‍या दुकानदारांवरही कारवाईचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. वाहनाला झालेल्या दंडात्मक कारवाईवेळीच ती नंबरप्लेट बनविणार्‍याचे नाव, पत्ता घेतल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करता येईल. 

आठ लाखांच्या दंडाची वसुली
शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जानेवारी ते डिसेंबर 2017 या वर्षात तब्बल 4064 जणांवर कारवाई करून 8 लाख 20 हजार 300 रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. कारवायांचा धडाका सुरू असूनही काही नियमबाह्य नंबरप्लेट आढळल्यास तत्काळ जप्‍तीची कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. 

पोलिस तपासात अडचणी

शहर सीसीटीव्हीच्या छायेत आणण्यात आले आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून होणार्‍या तपासात अशा फॅन्सी नंबरप्लेटच्या वाहनांचा वापर केल्याचे दिसून येते. अशा नंबरप्लेटमुळे पोलिस तपासात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. नंबरप्लेटवरील क्रमांकावरुन संबंधित मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न होतो. पण, अनेकदा नंबरप्लेटच पुसट असल्यास किंवा नंबर नसल्यास मोठी समस्या निर्माण होते.