Tue, Jul 16, 2019 10:00होमपेज › Kolhapur › वडाप सुसाट!

वडाप सुसाट!

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 09 2018 11:19PMकोल्हापूर : प्रतिनिधी

एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेला स्वयंघोषित संप दुसर्‍या दिवशीही सुरूच राहिला. त्यामुळे जिल्ह्यातील एस.टी.ची 80 टक्के वाहतूक बंद राहिली. या संपामुळे कोल्हापूर विभागाचा 80 लाखांचा महसूल बुडाला. प्रवाशांचे अतोनात हाल झाले.  

दरम्यान, प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांना परवानगी दिली. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक आवारात काळी-पिवळी टॅक्सी, स्कूल बसेस, ट्रॅव्हल्स लावण्यात आल्या होत्या. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत एस.टी.च्या 1,046 फेर्‍यांपैकी फक्त 55 फेर्‍या झाल्या. दुपारनंतर जिल्ह्यांतर्गत काही मार्गांवर काही गाड्या सोडण्यात येत होत्या. या संपामध्ये कोल्हापूर विभागातील 4,844 पैकी 2,865 कर्मचारी सहभागी झाले आहेत. एस.टी. प्रशासनाने जसे प्रवासी उपलब्ध होतील, त्याप्रमाणे शिवशाही व शिवनेरी बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, गडहिंग्लज, रत्नागिरी यासह प्रमुख मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. 

मालवाहू ट्रकमधूनही वाहतुकीस परवानगी

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बसेस, स्कूल बसेस, काळी-पिवळी टॅक्सी, टेम्पो, सुमो अशा वाहनांना परवानगी दिली आहे, इतकेच नाही तर मालवाहू ट्रकमधूनही प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर बसेस, टॅक्सी आदी वाहने लावण्यात आली होती. प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा आधार घ्यावा, असे परिवहन अधिकारी सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी परिवहन अधिकारी अरविंद कुंभार, रवी चव्हाण, प्रशांत इंगवले, पप्पू कापसे आदी उपस्थित होते.

काही वाहनचालकांकडून प्रवासी वेठीस

परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली; पण त्यांनी किती अंतराला केवढे भाडे आकारावे, याबाबत कोणत्याही सूचना केल्या नसल्याचे खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या एका चालकाने सांगितले. एस.टी.च्या संपाचा फायदा उठवत खासगी वाहतूकदारांनी दुप्पट ते तिप्पट भाडे आकरणी केली. खासगी आराम बसमधून शनिवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाली. परिवहन अधिकारी आणि पोलिसांसमक्ष ही वाहतूक सुरू होती.