Wed, May 22, 2019 11:12होमपेज › Kolhapur › मॅटर्निटी होमच्या आडून काळ्या कमाईचा धंदा

मॅटर्निटी होमच्या आडून काळ्या कमाईचा धंदा

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 12:40AMइचलकरंजी : प्रतिनिधी

कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना डॉ. अरुण पाटील याने तब्बल 20 वर्षांपासून वैद्यकीय सेवांचा बाजार मांडल्याने आरोग्य खाते नेमके करते तरी काय, असा संतापजनक प्रश्‍न केंद्रीय पथकाच्या छाप्यानंतर उपस्थित झाला आहे. प्रसूतीपूर्व सोनोग्राफी तपासणी व प्रसूती अशा ‘सेवा’ देत अरुण पाटीलने ‘मेवा’ कमावण्याचा धंदा अवैध मॅटर्निटी होमच्या आड चालवण्याचा उघडकीस आलेला प्रकार आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे खणण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉ. पाटील याचा लिगाडेमळ्यात वीस वर्षांपासून दवाखाना आहे. या दवाखान्यावर त्याने ‘जनरल सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटल’ असा फलक आहे. या फलकावर डॉ. अरुण पाटील असा ठळक उल्लेख आहे. त्यामुळे हॉस्पिटल डॉ. अरुण पाटील याचेच असल्याचा प्रसार सर्वत्र झाला. डॉ. पाटील यांचा दवाखाना अशीच या दवाखान्याची शहर व परिसरात ओळख होती व आहे. या दवाखान्याच्या फलकावर डॉ. एस. एस. कोडोलीकर यांचेही नाव आहे. डॉ. कोडोलीकर यांच्या नावापुढे ‘एम.डी. गायनॅक’ अशी पदवी आहे, तर डॉ. अरुण पाटील याच्या नावापुढे ‘एल. सी.ई.एच.’ पदवी आहे. 

‘एल.सी.ई.एच.’ म्हणजे नेमके काय याचा अर्थबोध सर्वसामान्यांना लवकर होत नाही. ‘लिसेन्शिएट इन द कोर्ट ऑफ एक्झामिनर्स इन होमिओपॅथी’ अशी ही पदवी आहे. थोडक्यात, होमिओपॅथी डॉक्टर अशी पदवी हाताशी असतानाही अरुण पाटील याने दवाखान्यात प्रसूतीगृह चालवले. इतकेच नाही, तर सोनोग्राफीसारखी सेवाही त्याने वर्षानुवर्षे पुरवली आहे.  

परवानगी कशी दिली?

सोनोग्राफी सेवा पुरवण्यासाठी आरोग्य खात्याची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आवश्यक कागदपत्रे पुरवून नोंदणी घ्यावी लागते. त्यानंतरच सोनोग्राफी सेवा पुरवता येते. अशी सेवा पुरवण्यासाठी परवानगी घेताना पाटीलने आरोग्य खात्याचीही दिशाभूल केल्याची शक्यता आता व्यक्‍त होत आहे. अरुण पाटील या नावानेच दवाखाना प्रसिद्ध असताना आणि तो साधा होमिओपॅथी डॉक्टर असतानाही आरोग्य खात्याने सोनोग्राफी व प्रसूतीगृह चालवण्याची परवानगी पाटीलला दिली तरी कशी, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.  

अर्भकांचा बाजार

सोनोग्राफी व प्रसूतीगृह चालवून अमाप संपत्ती कमावल्यानंतर त्याने मॅटर्निटी होमचा फंडा राबवला. कुमारी माता व विधवा यांना दवाखान्यातच आश्रय देऊन त्यांचे बाळंतपण करायचे आणि त्यातून जन्मलेल्या अर्भकांचा बाजार मांडायचा, असा उद्योग त्याने मॅटर्निटी होमच्या आडून चालवल्याचा धक्‍कादायक प्रकार केंद्रीय पथकाच्या धाडीनंतर उघडकीस आला. तोपर्यंत मॅटर्निटी होमच्या आत नेमके चालते तरी काय, याची खबरबात जिल्हा प्रशासनाला व आरोग्य खात्याला लागू नये, याचेही आश्‍चर्य आहे.  

नवजात अर्भक विक्रीची दोन प्रकरणे उघडकीस आली असली, तरी आतापर्यंत नेमक्या किती अर्भकांची विक्री झाली, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. 

आंतरराज्य रॅकेट 

पाटील याने छत्तीसगड व मुंबईत अर्भकांची विक्री केल्याची माहिती केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाने दिली आहे. अरुण पाटील याने ज्या मातांच्या अर्भकांची विक्री केली आहे त्यांच्या बँक खात्यांवर परराज्यांतून पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे नवजात अर्भकांच्या विक्रीचे हे आंतरराज्य रॅकेट असल्याच्या शक्यतेला पुष्टी मिळत आहे.  केवळ आर्थिक लालसेतून अरुण पाटील याने निर्दयी आणि निष्ठूर काम केले आहे. त्यामुळे या आंतरराज्य रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिस दलापुढे आहे. 

सामाजिक कार्याच्या नावाखाली बाजार 

केंद्रीय पथकाच्या छाप्यानंतर पाटीलने दोन नवजात अर्भकांची विक्री केल्याची कबुली दिली. आपल्या गैरकृत्यांना सामाजिक कार्याचा मुलामा देत अरुण पाटीलने बाजार मांडल्याने संतापाची लाट उसळली आहे. अरुण पाटील हा माजी नगरसेवक आहे. तो इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य समितीचा माजी सभापतीही आहे. पाटील याने तथाकथित सामाजिक कार्य व संपत्तीच्या जोरावर समाजात प्रतिष्ठा मिळवल्याचा आणि राजकीय पक्षांनीही त्याला राजाश्रय दिल्याचे वास्तव आहे.