Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटची बेकायदा लयलूट!

कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटची बेकायदा लयलूट!

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 9:51PMकोल्हापूर : सुनील कदम

जिल्ह्याच्या पश्‍चिम आणि दक्षिण भागातील सह्याद्रीच्या पठारावरून  बॉक्साईटची बेकायदेशीरपणे आणि राजरोसपणे लयलूट सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत आहेच, शिवाय जागतिक वारसास्थळाचा दर्जा असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचीही मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसत आहे. या प्रकाराची जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागाला पुरती जाणीव आहे, मात्र त्याकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यात शासनाने हिंडाल्को, भरतेश कन्स्ट्रक्शन आणि शिवराम मिनरल या तीन औद्योगिक कंपन्यांना बॉक्साईट उत्खननाने परवाने दिले आहेत. या कंपन्यांना वार्षिक दोन लाखापासून ते आठ लाख टनांपर्यंत बॉक्साईट उत्खननाचा परवाना देण्यात आला असला तरी या कंपन्यांनी नेमक्या किती बॉक्साईटचे उत्खनन केले आणि किती बॉक्साईट वाहून नेले याची मोजदाद करण्यासाठी त्या त्या ठिकाणी कोणतीही शासकीय यंत्रणा कार्यान्वित नाही. या तीनही तालुक्यातून दररोज अक्षरश: हजारो ट्रक बॉक्साईटची वाहतूक चालते. त्यामुळे या कंपन्यांचा परवाना आणि त्यांच्याकडून नेल्या जात असलेल्या बॉक्साईटची शासकीय दप्तरी असलेली मोजदाद संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या परवान्याची आणि त्या वाहतूक करीत असलेल्या बॉक्साईटची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

या तीन कंपन्यांशिवाय इतरही काही बॉक्साईट दलालांनी याच भागात बेकायदेशीरपणे बॉक्साईटचे उत्खनन सुरू केल्याचे दिसत आहे. या बॉक्साईटची संबंधित दलालांमार्फत खुल्या बाजारात विल्हेवाट लावली जात आहे. शासकीय आणि खासगी जागांमध्ये ही खुदाई सुरू असल्याचे आढळून येते. चार दिवसांपूर्वी जिल्हा खणीकर्म अधिकार्‍यांनी राधानगरी तालुक्यात आढळून आलेल्या बेकायदा बॉक्साईट साठ्यावर कारवाई करून जवळपास 70 लाखांचे बॉक्साईट जप्त केलेले आहे. विशेष म्हणजे या बॉक्साईटचे उत्खनन कोणी केले आणि कशासाठी त्याचा साठा करण्यात आला होता, याचा जिल्हा प्रशासनाला अजून थांगपत्ता लागलेला नाही. वास्तविक पाहता जिल्हाभर अशा प्रकारे सुरू असलेल्या बेकायदा बॉक्साईट  खुदाईची या यंत्रणेला चांगलीच जाणीव आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करण्याचे उद्योग सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राज्य शासनानेच जिल्ह्यातील या बेकायदा बॉक्साईट खुदाईला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे..

जागतिक वारसा स्थळावर नांगर!
जिल्ह्यात ज्या ठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन सुरू आहे, तो भाग सह्याद्रीच्या जागतिक वारसास्थळांचा दर्जा लाभलेल्या पर्वतरांगांमध्ये येतो. या वारसास्थळांचे जतन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने वन, पर्यावरण आणि महसूल खात्याची आहे. मात्र, आज या तीन खात्यामधीलच काहीजणांच्या आशीर्वादाने सह्याद्रीच्या संवेदनशील पठाराची लांडगेतोड सुरू आहे. त्यामुळे या जागतिक वारसा स्थळावर अक्षरश: नांगर फिरवला जात आहे.