होमपेज › Kolhapur › ..तर पालकमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : सतेज पाटील

..तर पालकमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू : सतेज पाटील

Published On: Apr 16 2018 1:12AM | Last Updated: Apr 16 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

काँग्रेसने विकासात्मक द‍ृष्टिकोन ठेवून शहर विकासासाठी तब्बल 1,300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सत्ताधारी भाजप मात्र केवळ नगरसेवक पळवून नेण्याचे काम करीत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या विकासासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे थेट आव्हान आ. सतेज पाटील यांनी दिले. वाढदिवसानिमित्त टिंबर मार्केट येथे आयोजित मॉडेल रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

आ. पाटील म्हणाले, महापालिकेतील घोडेबाजार बंद करण्यासाठी आम्ही पक्षीय राजकारण मुद्दाम आणले. यानिमित्ताने सात वर्षे महापालिकेत स्थिर शासन दिले. मात्र, स्थायी सभापती निवडीवेळी दोन नगरसेवक फोडून पुन्हा एकदा घोडेबाजार सुरू केला. थेट पाईपलाईन, नगरोत्थान, ड्रेनेजलाईन अशी विकासाची कामे केली आहेत.  अंबाबाई आराखडा, शाहू मिल स्मारक ही कामे प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर केवळ भूमिपूजन होताना दिसेल, प्रत्यक्ष काम मात्र काहीच दिसणार नाही. त्यामुळे भाजप सरकारची अवस्था हॉटेलसमोरून जाताना जेवणाचा वास मिळेल, जेवण मात्र मिळणार नाही, अशी झाली आहे. 

आ. पाटील यांनी टिंबर मार्केटमधील फायनल ले-आऊटचा प्रश्‍न मांडताना दबाव टाकला की आयुक्‍त ऐकतात, असे सांगत तावडे हॉटेल अतिक्रमण कारवाईसंदर्भात भाजप सरकारला टोला लगावला. ते म्हणाले, श्रीमंती घरचीच आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आम्हाला नको आहे. शहराचा विकास आणि सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे. सत्तेत असताना आम्ही कधी प्रसारमाध्यमांना धमकी दिली नाही. चूक असल्यास माध्यमांनी त्यांचे काम करावे, हा संकेत आहे. आम्ही तो पाळतो. कोल्हापुरात दबावाचे राजकारण सुरू झाले, हे दुर्दैव आहे. जनता सुज्ञ आणि हुशार असते. वेळ आणि संधी मिळाली की, ती आपली ताकद दाखवून देते.

सत्ताधार्‍यांनी चांगल्या कामांना ‘खो’ न घालता, पैसा आणि मदत देण्याची भूमिका घ्यावी. आम्ही चुकत असू, तर दाखवून द्या, बरोबर असेल तर बरोबर म्हणा. थेट पाईपलाईन योजनेत महापालिकेने 90 कोटी रुपये द्यावे, असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. विकासाचा द‍ृष्टिकोन नसणारी माणसे सत्तेत आली आहेत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही आ. पाटील म्हणाले.

सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविकात गंजीमाळ व टिंबर मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली. याप्रसंगी दिनकर आवळे, ठेकेदार अरुण पाटील, शिक्षण सभापती सौ. वनिता देठे, सौ. छाया सांगावकर यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास महापौर सौ. स्वाती यवलुजे, सभागृह नेता दिलीप पोवार, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुरेखा शहा, शारंगधर देशमुख, सागर चव्हाण, वसंतराव देशमुख, तौफिक मुल्‍लाणी आदी उपस्थित होते. नगरसेविका सौ. जयश्री चव्हाण यांनी आभार मानले.