Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Kolhapur › ...तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढू

...तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढू

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:34AMदेवाळे : वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्यायाला कंटाळून भाजपमध्ये असंख्य कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे न थांबल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढू, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हळदी (ता. करवीर) येथे दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हाळवणकर होते.

पाटील म्हणाले, भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान देणारा व विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. करवीर तालुक्यातील राष्ट्रवादीला भाजपने सुरुंग लावला आहे. के. डी. सी. सी. बँकेच्या राजकारणात आमदार हसन मुश्रीफ व पी. एन. पाटील यांचे साटेलोटे झाले असून, के. डी. सी. सी. बँक व भोगावती अशा फॉर्म्युल्यानुसार वाटणी झाली आहे. यात हंबीरराव पाटलांसारख्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी देऊन स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने विकास निधी मंजुरीची पत्रे वाटली; पण भाजपने गेल्या तीन वर्षांत शेती, उद्योगासाठी भरीव काम करून राज्याचे उत्पन्‍न वाढविले. कै. खानविलकरांच्यानंतर करवीरचा रखडलेला विकास भाजप पूर्ण करेल. 40 गावांतील भाजप पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊ.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, करवीरच्या कार्यकर्त्यांनी अन्यायाला कंटाळून दंडाला बंडाचे निशाण लावून भाजपमध्ये प्रवेश केला. रखडलेला विकास भाजप करून देईल. भोगावतीत पैसे घेऊन नोकर्‍या लावल्याने राष्ट्रवादीचा पराभव झाला. भोगावतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला ही चूक झाली. आगामी काळात हंबीरराव पाटील व नामदेवराव काका यांच्या नेतृत्त्वाखाली सभासदहितासाठी संघर्ष करू.

हंबीरराव पाटील म्हणाले, स्थापनेपासून प्रामाणिकपणे राबून सुद्धा राष्ट्रवादीने अन्याय केल्याने व विकासकामांसाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. स्वागत व प्रास्ताविक नामदेवराव पाटील यांनी केले. आभार दयानंद कांबळे यांनी मानले.

यावेळी भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील यांच्यासह 40 गावांतील माजी-आजी सरपंच-उपसरपंच, राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.