Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Kolhapur ›

कचर्‍याचे ‘अंदाजे’ माप 

कचर्‍याचे ‘अंदाजे’ माप 

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:27AMइचलकरंजी : वार्ताहर

येथील सांगली रोडवर असणार्‍या कचरा डेपोतील कचर्‍याचे वजन करण्यासाठी असलेल्या वजनकाट्याचा गेल्या दीड वर्षापासून ‘कचरा’ झाला आहे. नवीन वजनकाटा बसवण्याचे काम निविदेच्या प्रक्रियेत अडकले आहे. प्रत्यक्षात करारातील अटीप्रमाणे वजनावरच बिल आदा करणे गरजेचे असताना, गेल्या चार महिन्यांपासून वजन न करताच बिले आदा करण्यात येत आहेत. परिणामी, पालिकेस महिन्याकाठी हजारो रुपयांचे, तर वर्षाकाठी सरासरी सव्वा कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

इचलकरंजी शहरातील कचरा उठावासाठी 14 व्या वित्त आयोगातून मंजूर 3 कोटी 78 लाख रुपयांचे काम बीव्हीजी या कंपनीला पालिकेने दिले आहे. 1 सप्टेंबर 2017 पासून दैनंदिन कचरा गोळा करण्याचे काम बीव्हीजी कंपनीकडून सुरू आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना इचलकरंजी शहरातील 26 वॉर्डमधून 140 टन कचरा निर्माण होतो, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्याप्रमाणे लागणारी वाहने, कर्मचारी, इंधन, वाहनांचा खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. यानुसार 674 रुपये प्रतिटन असा दर ठरवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात निविदा मंजूर करताना जादाची 9.80 टक्के दराने प्रतिटन 740 रुपये देण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. बीव्हीजीबरोबर पालिकेने करार करताना घातलेल्या अटींमध्ये डंपिंग ग्राऊंडवरील वजनकाट्यावर प्रत्येक वाहनातील कचर्‍याचे वजन करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कचरा डेपोतील वजनकाटा बंद आहे. 

पालिकेने ठरवून दिलेल्या बाहेरील वजनकाट्यावरही कंपनीने कचर्‍याचे वजन करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ते होत नाही. दररोज किती कचरा निर्माण होतो, याची कोणतीच नोंद पालिकेकडे नसताना, गेल्या तीन महिन्यांचे बिल मात्र कंपनीस आदा करण्यात आले आहे. याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यामध्ये प्रतिव्यक्ती दररोज 0.300 ग्रॅम कचरा गृहीत धरून दररोजचा एकूण अंदाजे 87 टन कचरा निर्माण होतो, असे म्हटले आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी कचरा भरलेल्या गाडीच्या वजनाची प्रत्यक्षात पाहणी केली होती. त्यामध्ये दररोज होणारी ट्रॉली व कॉम्पॅक्टरच्या खेपा यांची गोळाबेरीज केली असता शहरात 90 टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होत नाही, असे निष्पन्नही झाले आहे. प्रत्यक्षात मात्र बीव्हीजी कंपनीला पालिका अंदाजे 40 ते 50 टनांचे जादा पैसे मोजत आहे. कचर्‍याचे वजन करणे आवश्यक असताना  ते केले जात नसल्याने पालिकेला महिन्याकाठी 20 ते 25 हजारांचे नुकसान सोसावे लागत  आहे. याबाबत झालेल्या तक्रारीनंतर वजनकाटा बदलण्याबाबत निविदाही काढण्यात आली. 

गेल्या काही दिवसांपासून वजनकाट्याचा प्रश्‍न निविदेच्या प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे विनावजन कचरा उचलण्याबरोबरच प्रत्यक्षात कचरा जादा निर्माण होत असताना जादाच्या टनाचे पैसे मक्तेदारास आदा केले जात आहेत. अंदाजपत्रकात ठरवलेल्या टनाचा दर गृहीत धरूनच व करारात नमूद अटींप्रमाणेच मक्तेदाराकडून काम करून घेणे आवश्यक असताना, याकडे पालिकेचे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्षच आहे. पालिकेचे हित जोपासण्याऐवजी मक्तेदाराची तुंबडी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी जमा केलेल्या रकमेवर डल्ला मारण्याच्या सुरू असलेल्या कामाला कोण आळा घालणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

 

Tags : ichalkaranji municipal council, Garbage