होमपेज › Kolhapur › घनकचरा व्यवस्थापनाचा ‘कचरा’

घनकचरा व्यवस्थापनाचा ‘कचरा’

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 1:16AMइचलकरंजी : वार्ताहर

येथील आसरानगर परिसरातील कचरा डेपोतील कचर्‍याच्या वाढत्या ढिगाबरोबरच भागातील नागरिकांच्या समस्याही तितक्याच गंभीर बनत चालल्या आहेत. पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पासाठी 27.40 कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. मात्र, या आराखड्यात काही त्रुटी असल्याचे पुढे आले असून हा प्रकल्पही जुन्या कल्पाप्रमाणे निरुपयोगी ठरू नये यासाठी प्रस्तावात सुधारणा करण्याबरोबरच प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी गतीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

इचलकरंजी शहरात दररोज निर्माण होणारा 150 ते 175 टन कचरा आसरानगर येथील मैलखड्डा परिसरात टाकला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या या क्षेपणभूमीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पालिकेकडून या साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पाकडे पालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे प्रकल्प बंद पडण्याबरोबरच येथील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्रीचाही कचरा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या उपलब्ध साधनांच्या सहाय्याने कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र, हा केवळ दिखावाच ठरला आहे. त्यामुळे दररोज साचणार्‍या कचर्‍याच्या प्रमाणात जुन्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने कचरा डेपोतील कचर्‍याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 

कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्याने भागातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कचरा डेपोमुळे भागातील नागरिक नरकयातना सहन करीत आहेत. दिवसभर दुर्गंधी आणि रात्री धुराचे लोट यामुळे नागरिकांना श्‍वास घेणेही मुश्कील बनले आहे. पालिकेकडून कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नवा प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी  14 व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. नव्या प्रकल्पासाठी 27.40 कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. टाटा कन्सल्टन्सी या खासगी कंपनीकडून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास नुकतीच पालिका सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी देतानाच या प्रस्तावामध्ये अन्य त्रुटीही असल्याचे समोर आले आहे. नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रस्तावावर आक्षेप घेत या त्रुटी पालिका सभेत निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

कचरा प्रक्रिया प्रकल्पाची दररोज कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची क्षमता, त्यापासून पालिकेला मिळणारे उत्पन्न यासह अन्य बाबींचे स्पष्टीकरण होत नाही. त्यामुळे हा नवा प्रकल्पही जुन्या प्रकल्पाप्रमाणेच कुचकामी ठरल्यास त्याचे गंभीर परिणाम पालिकेसह कचर्‍याच्या समस्येला दररोज तोंड देणार्‍या भागातील नागरिकांना सोसावे लागणार आहेत. कचरा प्रक्रिया प्रकल्पाची वेळेत उभारणी न झाल्यास पालिकेसमोर कचरा टाकण्यासाठी जागेचा प्रश्‍नही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुधारित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रस्तावासह त्याची मंजुरी व उभारणीसाठी पालिका पदाधिकार्‍यांकडून गतीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.