Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Kolhapur › लक्षवेधी डावलल्याने विरोधकांचा गदारोळ

लक्षवेधी डावलल्याने विरोधकांचा गदारोळ

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:06AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

बहुमताच्या जोरावर विरोधी नगरसेवकांचा आवाज दाबण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहात चर्चा करायची की नाही, असा सवाल आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी विरोधी व सत्तारूढ गटामध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. विषयपत्रिकेवरील विषय बाजूला ठेवून अन्य विषय घेतल्यास तो विषय थांबवला जाईल, असा दम नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी भरला. यावेळी काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. बहुमताच्या जोरावर शहरातील सारण गटारींची सफाई करण्याच्या 85 लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. 

विषयपत्रिकेवरील 18 आणि ऐनवेळच्या 4 विषयांवर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी आज सर्वसाधारण सभा बोलावली होती. ऐनवेळच्या विषयांची यादी नगरसेवकांना दोन तास आधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयांवर अभ्यास करून सभागृहात मांडणी करणे शक्य होते. त्यामुळे सभेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल चोपडे यांनी केले. वादळी वार्‍यानंतर शहरातील अनेक स्ट्रीटलाईट बंद असल्यामुळे शहर अंधारात आहे. त्यामुळे स्ट्रीटलाईटची दुरुस्ती करावी, अशी मागणी सौ. बिल्कीस मुजावर यांनी केली. फायबरचे स्वच्छतागृह खरेदी करताना वॉरंटी न घेतल्यामुळे मक्तेदाराची जबाबदारी संपुष्टात आली आहे. त्यामुळे स्वच्छतागृह खराब निघाल्यास होणारा तोटा पालिकेने का सहन करायचा, असा सवाल शशांक बावचकर यांनी उपस्थित केला. अजेंडा सोडून होणार्‍या विषयांवरील चर्चेवर सत्तारूढ व विरोधी नगरसेवकांत चांगलीच खडाजंगी उडाली. 

केवळ अजेंड्यावरील विषयांवरच चर्चा करण्याची भूमिका सत्तारूढ गटातील नगरसेवकांनी घेतली. यावेळी ही हुकूमशाहीच सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नागरी प्रश्‍नांवर बोलायचे की नाही, बोलायचे नसेल तर सर्वसाधारण सभा कशासाठी असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर अजेंड्यावरील विषयांवर चर्चा झाली. शहरातील सारण गटारी साफ करण्याच्या 85 हजार 368 रुपयांच्या प्रस्तावाला विरोधकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर तो मताला टाकण्यात आला. त्यावेळी 27 विरुद्ध 17 मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. बालवाडीची पटसंख्या कमी असल्यामुळे बालमंदिरे इतर बालमंदिरात समाविष्ट करण्यास किंवा बंद करण्यास मंजुरी मिळावी या कार्यालयाकडून आलेल्या प्रस्तावाला सत्तारूढ व विरोधकांनी विरोध केला. बालमंदिरात सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा पुरवून बालमंदिरांना संजीवनी द्यावी यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असा प्रस्तावही ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या. ‘अमृत’ अभियानातून कृष्णा योजनेसाठी नवीन पंप बसवणे व दुरुस्त करणे यासाठी निधी मिळणार असताना सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च पंप दुरुस्तीसाठी का करण्यात येत आहे, असा सवाल विरोधकांनी विचारला. ‘अमृत’ योजनेतून मिळणार्‍या निधीला वेळ लागणार असल्यामुळे दरम्यानच्या काळात पंप खराब झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता गृहीत धरून हा प्रस्ताव दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिका फंडातील 4 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यातील 41 लाखांचा निधी जेसीबी, बुल्डोजर भाड्याने घेण्यासाठी वर्ग करावा, असा प्रस्ताव कार्यालयाकडून प्राप्त झाला होता. त्याला विरोधी नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे 23 विरुद्ध 15 मतांनी मंजूर करण्यात आला. कचरा उठावाचा बीव्हीजी कंपनीला ठेका दिला असतानाही बीव्हीजी कंपनी पालिकेच्या कर्मचार्‍यांचा वापर करून घेत आहे. त्यामुळे बीव्हीजीच्या कामकाजाबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी,  ग्रीन सिटी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा पोलखोल होणे गरजेचे असून संबंधित मक्तेदारांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी यावेळी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत पक्षप्रतोद तानाजी पोवार, अजित जाधव, सागर चाळके, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, राजू बोंद्रे, राहुल खंजिरे आदींनी सहभाग घेतला.