Mon, Sep 24, 2018 16:52होमपेज › Kolhapur › अर्भक विक्री; डॉक्टर पत्नीस पोलिस कोठडी

अर्भक विक्री; डॉक्टर पत्नीस पोलिस कोठडी

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 12 2018 12:33AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

नवजात अर्भक विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या डॉ. अरुण पाटील याची पत्नी उज्ज्वला  पाटील (वय 56) हिला रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील आळते येथून अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

कोल्हापुरातील बाल संरक्षण हक्क समितीच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी जवाहरनगर येथील डॉ.अरुण पाटील, उज्ज्वला पाटील व बालके विकत घेतलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता. डॉ.अरुण पाटील याच्यासह बालक विकत घेणारे अनिल चहांदे व सौ.प्रेरणा चहांदे (रा.नवरगाव, चंद्रपूर) यांना यापूर्वीच अटक केली आहे. यातील संशयित  उज्ज्वला फरार होती. 

डॉ. पाटील याने हॉस्पिटलमध्ये केलेल्या प्रसूतींचे रेकॉर्ड पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. काही जणांकडून आज जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. डॉ. पाटील याने शहरातील दोन सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफीसाठी पाठवलेल्या गर्भवतींची यादीही ताब्यात घेतली होती. दोन्ही डॉक्टरांचे जबाब व काही रुग्णांकडून माहिती घेण्यात येत आहे. डॉ.पाटीलच्या दवाखान्यातील सोनोग्राफी मशीन डॉ. एस.एम.कोडोलीकर यांच्या नावावर असल्याचे तपासात पुढे आले आहे. केवळ सिझरसाठीच त्या हॉस्पिटलमध्ये जात असल्याचा जबाब डॉ.कोडोलीकर यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत उज्ज्वला पाटील हिच्याकडे या प्रकरणाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते.