Thu, Jun 27, 2019 02:19होमपेज › Kolhapur › इंदिरा इस्पितळाकडे 366 नवीन पदे

इंदिरा इस्पितळाकडे 366 नवीन पदे

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 11:48PMइचलकरंजी : वार्ताहर

इंदिरा गांधी इस्पितळाकडे 200 बेडसह 366 पदांच्या निर्मितीचा बर्‍याच दिवसांपासून लालफितीत अडकलेला प्रस्ताव अखेर मंजूर झाल्याने या रुग्णालयास संजीवनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खर्चासाठीच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आल्यामुळे रुग्णालयाला ‘अच्छे दिन’ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे. 

इचलकरंजी शहरातील नागरिकांना विविध आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी 1994 मध्ये इंदिरा गांधी इस्पितळाची उभारणी करण्यात आली. विविध आरोग्य सेवा पुरवणार्‍या या रुग्णायाचा खर्च डोईजड झाल्याने पालिकेने रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. नगरपालिकेकडून सुरुवातीला झालेला विरोध, राजकीय कुरघोड्या यामुळे हस्तांतरणाचा वादही चांगलाच रंगला. त्यानंतर हस्तांतरणाचा विषय शासनाच्या लालफितीच्या कारभारातही अडकला होता. मोठ्या प्रयत्नानंतर जून 2016 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर 27 फेब्रुवारी 2017 पासून शासनाकडून या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला. हस्तांतरणाचे सोपस्कार प्रलंबित असल्याने तसेच शासनाच्या आरोग्य व नगरविकास विभागाच्या उदासीनतेमुळे येथील कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांसह आरोग्य सुविधांचा प्रश्‍न रखडला. शासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना आरोग्य सुविधेपासून गेल्या वर्षभरापासून वंचित राहावे लागले आहे. वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासह पद निर्मितीचा व सेवा-सुविधांचा मार्ग सुकर झाला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयास सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. 

इंदिरा गांधी रुग्णालयासाठी नव्याने 366 पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये समावेशनाने 53, आरोग्य विभागामार्फत 102 व कंत्राटी पद्धतीने 2 पदे, 63 पदे नियमित, 87 पदे कुशल व 69 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, अधिसेविका, सहायक अधिसेविका, परिसेविका, बालरोग परिचारिका, अधिपरिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, आहारतज्ज्ञ, रक्तपेढी, क्ष-किरण, प्रयोगशाळा, ईसीजी, भौतिक उपचार तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, भांडार तथा वस्त्रपाल, अभिलेखापाल, वीजतंत्री मुकादम, बाह्य रुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, कक्ष सेवक, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, लेखापाल आदींसह विविध पदांचा समावेश असणार आहे. रुग्णालयाच्या खर्चासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीही शासनाकडून करण्यात आल्या असून सुमारे 11 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयातील सेवा पुरवण्याची हमी राज्याच्या आरोग्य विभागाने घेतल्याने नागरिकांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. 

गेल्या वर्षभरापासून आरोग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यातच खासगी रुग्णालयातील वाढता खर्च व आयसीएम रुग्णालयातील उपचाराच्या मर्यादा यामुळे आरोग्य सुविधेसाठी नागरिकांना शहर सोडून इतरत्र धाव घ्यावी लागत असल्याने त्यांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. पद निर्मितीसह खर्चाच्या तरतुदीलाही शासनाने मान्यता दिल्यामुळे आता रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.