होमपेज › Kolhapur › काँग्रेसमध्ये मी एकाकी नाही : पी. एन. पाटील

काँग्रेसमध्ये मी एकाकी नाही : पी. एन. पाटील

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी

काँग्रेसचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. राज्यातील नेत्यांसह दिल्लीतील नेत्यांपर्यंत माझे सलोख्याचे संबंध आहेत. मी कोणालाही पक्षातून काढत नाही. पक्षवाढीसाठीच नेहमी प्रयत्नशील असतो. कुणाबरोबर माझा वाद नाही की मी कोणावर टीका करत नाही. त्यामुळेच मी सहावेळा राजीनामा देऊनही पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्‍वास दाखवत मलाच जिल्हाध्यक्षपदी बसविले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मी एकाकी पडलेलो नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले. ते म्हणाले, संघर्ष यात्रेअंतर्गत कोल्हापूरनंतर हसूर दुमाला या माझ्या करवीर मतदारसंघातील गावात मेळावा होणार होता. परंतु, माझ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्याप्रमाणे कळविले. त्यानंतर मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले. आजपर्यंत काँग्रेसशिवाय कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घेतलेला नाही आणि भविष्यात घेणारही नाही. मी पक्षाबरोबर एकनिष्ठ असल्यानेच गेली 19 वर्षे जिल्हाध्यक्ष आहे. बर्‍याच जणांनी पी. एन. यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढावे, यासाठी धडपड केली. परंतु, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले, गोविंदराव आदिक, रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे यांच्यासह विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा माझ्यावर विश्‍वास असल्यानेच पदावर ठेवलेले आहे.

जिल्ह्यात नेहमी काँग्रेस वाढविण्यासाठीच मी प्रयत्न केल्याचे सांगून ते म्हणाले, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. गेली 25 वर्षे राज्यात फक्‍त मी राजीव गांधी दौड घेतो. आजही मी मेळावा घ्यायचा ठरवले तर दोन-तीन लाखांवरच गर्दी जमेल, एवढी ताकद आहे. त्यामुळे पी. एन. हा बिनमाणसाचा नाही. गांधी घराण्याशी मी आजअखेर प्रामाणिक राहिलो आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी मी कधीही आग्रही नाही. प्रदेश काँग्रेसचा सेक्रेटरी व राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य या पदावरही मी कार्यरत आहे. बदलासाठी मी कधीही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.