Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून 

कोल्‍हापुरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून 

Published On: May 23 2018 9:40AM | Last Updated: May 23 2018 10:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून करून पतीने धारदार विळीने स्वत:च्या गळ्यावर, हातावर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उचगाव (ता. करवीर) येथील जानकीनगरात मंगळवारी मध्यरात्री घडली. विद्या शिवाजी ठोंबरे (वय 22) असे महिलेचे नाव आहे. गंभीर अवस्थेतील शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40, रा. जानकीनगर) याच्यावर उपचार सुरू आहेत. ठोंबरेने चार वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा याच कारणातून अमानुष खून केला होता.

मेहुण्याच्या डोळ्यादेखत विद्याचा गळा आवळून खून केल्याने नातेवाईकांसह जानकीनगर परिसरातील नागरिकांना जबर धक्‍का बसला आहे. गांधीनगर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून बेशुद्ध महिलेसह रक्‍ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या पतीला शासकीय रुग्णालयात हलविले.उपचारापूर्वीच विद्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अतिरक्‍तस्रावामुळे शिवाजीची प्रकृती गंभीर बनली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. डिस्चार्ज होताच त्याला अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जानकीनगर येथील खबाले मंगल कार्यालयाजवळील खोलीत संसार थाटलेला शिवाजी हा रखवालदार व रिक्षाचालक म्हणून काम करीत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचा नात्यातील कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील दत्तात्रय श्रीमंत धायगुडे (रा. अहिल्यानगर) यांची मुलगी विद्या हिच्याशी विवाह झाला होता.लग्‍नानंतर काही दिवस त्यांच्यात सुखाचा संसार चालला. त्यानंतर मात्र तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. उपाशीपोटी ठेवून शिवाजी विद्याला मारहाण करू लागला. विद्याने आई, वडिलांशी संपर्क साधून पतीकडून शारीरिक, मानसिळ छळ सुरू असल्याचे सांगितले. नातेवाईकांनीही  दोघांची समजूत काढून भांडण-तंटा न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही पती, पत्नीतील वाद सुरू राहिला.

सोमवारी दिवसभर शिवाजीने पत्नीला बेदम मारहाण केली. पहिल्या बायकोप्रमाणे तुझाही खून करेन, अशी धमकीच दिली. त्यामुळे भेदरलेल्या विद्याने वडील दत्तात्रय, भाऊ प्रकाश धायगुडे यांच्याशी संपर्क साधून मला ताबडतोब गावाकडे घेऊन जा, असा निरोप दिला. त्यानुसार भाऊ प्रकाश धायगुडे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी रेल्वेने गांधीनगर येथे आला. मेहुण्याला आणण्यासाठी शिवाजी स्वत: रेल्वेस्थानकावर गेला.

पती, पत्नीसह प्रकाश अशा तिघांनी रात्री घरात एकत्रित जेवण केले. सर्व जण एकाच खोलीत झोपी गेले. पहाटे साडेचारच्या सोलापूर एक्स्प्रेस रेल्वेने सोलापूरला जाण्याचे नियोजनही ठरले. त्यास शिवाजीनेही होकार दर्शविला. त्यानुसार विद्या मध्यरात्री तीन वाजता उठली. तिने भावालाही उठविले. बहीण-भाऊ गावी जाण्यासाठी आवरा-आवरीच्या धांदलीत होते. प्रकाश लघुशंकेसाठी खोलीतून बाहेर पडताच झोप लागल्याचे नाटक केलेला शिवाजी अचानक अंथरुणातून उठला त्याने खोलीला आतील बाजूने कडी लावून घेतली. पत्नीच्या तोंडावर ठोसे लगावण्यास सुरुवात केली. अनपेक्षित घटनेमुळे विद्याने आरडाओरडा केला. त्यामुळे प्रकाशने दरवाजा ठोठावला. कडी लावल्याने दरवाजा उघडू शकला नाही. त्याने खिडकीची काच फोडली.

भावाच्या डोळ्यादेखतच विद्याचा गळा आवळला

बहिणीला मारहाण करू नकोस, दरवाजा उघड, अशी प्रकाश विनवणी करीत असतानाच शिवाजीने पत्नीला खाली पाडले. छातीवर बसून पुन्हा ठोसे लगावले. विद्याने प्रतिकाराचा प्रयत्न करताच, शिवाजीने तिचा गळा आवळला. काही क्षणात तिची हालचाल थंडावल्यानंतर खोलीतील धारदार विळी घेऊन वार करून घेतले.

प्रकाशची बोलतीच बंद झाली

गळ्यावर झालेल्या खोलवर वारामुळे शिवाजी रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळला. डोळ्यादेखत घडलेला प्रकार पाहून प्रकाशची काहीकाळ बोलतीच बंद झाली. भानावर आलेल्या मेहुण्याने आरडाओरडा करून शेजारच्या नागरिकांना बोलाविले. खिडकीतून सारा प्रकार पाहून सारेच भेदरले.

पोलिसांनी बंद खोलीचा दरवाजा तोडला!

नागरिकांनी सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून विद्यासह शिवाजीला उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविले. मात्र, विद्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्‍तस्रावामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या शिवाजीला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

चारित्र्याच्या संशयातून पहिल्या पत्नीचाही छळ

शिवाजी हा मूळचा माढा तालुक्यातील आहे. रोजंदारीसाठी पंधरा वर्षांपूर्वी उचगाव परिसरात वास्तव्याला आला आहे. दहा वर्षांपूर्वी सुलभा हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्येही आहेत. चारित्र्याचा संशय घेऊन पहिली पत्नी सुलभाचाही त्याने शारीरिक, मानसिक छळ केला होता. पतीकडून होणार्‍या छळाला कंटाळून सुलभा काहीकाळ माहेरी सोलापूरला गेली होती.

लोखंडी पहारीने सुलभावर हल्ला

शिवाजी काहीकाळ सुलभा हिच्या घरात राहू लागला; पण काही दिवसांनी त्यांच्यात याच कारणातून वाद सुरू झाला. संतापलेल्या शिवाजीने दि. 2 जुलै 2014 रोजी लोखंडी पहारीने डोक्यात प्रहार करून सुलभाला जखमी केले होते. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोक्यात सिलिंडर घालून पहिल्या पत्नीचा घेतला बळी

पत्नीवर केलेल्या हल्ल्यानंतरही शिवाजीने सुलभा व अन्य नातेवाईकांची माफी मागून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची हमी दिली. त्यामुळे नातेवाईकांनी सुलभासह दोन मुलांना शिवाजीसमवेत कोल्हापूरला पाठविले. त्यानंतर पुन्हा शिवाजीच्या डोक्यात संशयाचे भूत संचारले. दि. 10 सप्टेंबर 2014 मध्ये भरलेले गॅस सिलिंडर डोक्यात घालून सुलभाचा खून केला होता. याप्रकरणी शिवाजीवर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. शिवाजी दोन वर्षे कळंबा कारागृहात होता. दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजी खटल्याचा निकाल होऊन त्याची सुटका झाली होती. त्यानंतर त्याने नात्यातील विद्याशी विवाह केला होता.

संशयिताचा रुग्णालयात धिंगाणा

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना संशयित ठोंबरे दुपारी शुद्धीवर आल्यानंतर त्याने आरडाओरड करीत गोंधळ माजविला. त्यामुळे अतिदक्षता विभागातून त्याला अन्यत्र हलवावे लागले.

Tags : kolhapur district uchgaon, husband, wife, murder