कोल्हापूर : प्रतिनिधी
मालमत्तेचा हिस्सा मागितल्याने आकसापोटी पतीने मित्राकरवी अत्याचार करून त्याची व्हिडीओ क्लिप बनविल्याचा धक्कादायक आरोप इचलकरंजीतील महिलेने केला आहे. पतीकडून वारंवार होणार्या मारहाणीनंतर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याने तिने विधी व सेवा प्राधिकरणकडे धाव घेतली आहे.
पीडित महिला मूळची सोलापूर जिल्ह्यातील असून ती इचलकरंजीतील एका पक्षाच्या तालुकाध्यक्षासोबत राहते. तिने संबंधित तालुकाध्यक्षासोबत विवाह केल्याचा दावा केला आहे. पीडित महिला तिच्या मुलीसोबत राहण्यास आहे. तिने पतीकडे मालमत्तेत हिस्सा मिळावा, अशी मागणी केली होती; मात्र यातून चिडून पती व सावत्र मुलाने तिला मारहाण केली. याबाबत तिने शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
आकसापोटी पीडितेला तिच्या पतीच्या मित्राशी जबरी संभोग करण्यास भाग पाडून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत मालमत्तेचे हक्कसोडपत्र जबरदस्तीने करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांकडून राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचे तिने जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे.
बुधवारी सायंकाळी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.