Tue, Apr 23, 2019 19:46होमपेज › Kolhapur › हुपरी न.प.साठी आज मतदान

हुपरी न.प.साठी आज मतदान

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:34AM

बुकमार्क करा

हुपरी : वार्ताहर

हुपरी नगरपालिकेसाठी बुधवारी (दि. 13) चुरशीने मतदान होत आहे.  लोकलढ्यातून निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. प्रथम नगराध्यक्ष, नगरसेवक हे ऐतिहासिक ठरणार असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. हायटेक प्रचार यंत्रणा, वासुदेव, पिंगळा, पथनाट्य, ढोल-ताशा आदींमुळे प्रचारात रंगत  होती.

ठेवणीतील मोहरे शेवटच्या क्षणी बाहेर काढून प्रचार यंत्रणा तापवली गेली. त्यामुळे शहरात उत्सुकता होती. निवडणुकीत कोणताही दगा-फटका होऊ नये यासाठी सर्वांनीच आपल्या यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. शेवटी पदयात्रा, कोपरा सभांनी रंगत आणली.

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 9 प्रभागांत 27 मतदान केंद्रे स्थापण्यात आली आहेत. मतदान निर्भयपणे व्हावे व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे आदी मंडळी कार्यरत आहेत. शहरात पोलिस कुमक वाढवण्यात आली आहे.

मोठा पोलिस फौजफाटा

मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1 पोलिस उपअधीक्षक, 12 पोलिस अधिकारी, 100 पोलिस कर्मचारी आणि विशेष कृती दलाच्या 2 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात केल्या आहेत. 27 केंद्रांवर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलिस असा कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर एक कंट्रोल युनिट, दोन बॅलेट युनिट ठेवण्यात येणार असून, सर्व मतदान यंत्रे तपासून सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

आज सार्वजनिक सुट्टी

राज्यातील नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या  निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवारी शासनाने  सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, बँका व सार्वजनिक उपक्रमातील निवडणूक क्षेत्रातील किंवा क्षेत्राच्या बाहेरील कार्यालयात कार्यरत असणार्‍या मतदान अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सुट्टी आहे.