Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Kolhapur › हुपरीच्या चांदी उद्योगाला झळाळी कधी?

हुपरीच्या चांदी उद्योगाला झळाळी कधी?

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:35AMहुपरी : अमजद नदाफ

मॅग्‍नेटिक महाराष्ट्रच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने अहमदनगर येथे गोल्ड ज्वेलर्स सेंटरची घोषणा करून 6 कोटींचे अनुदान दिले आहे. त्याच पद्धतीने हुपरीसह 10 गावांत असणार्‍या चांदी उद्योगासाठी सिल्व्हर सेंटरची घोषणा करणे गरजेचे असून त्यामुळे या दहा गावांतील लाखो कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन हुपरीच्या या उद्योगाला नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या आशीर्वादाने वैभव प्राप्त केलेले हुपरी हे शहर कोल्हापूरपासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी शेतीकामात असणार्‍या या गावाने नंतर चांदी उद्योगात प्रवेश केला. कोल्हापूर संस्थानच्या लवाजम्यातील हत्ती, घोडे यांना चांदीच्या दागिन्यांनी सजविण्याचे काम हुपरीकरांकडे आले, असे जुने लोक सांगतात. वामन कृष्णाजी पोतदार व वामन केशव पोतदार यांना या उद्योगाचे जनक मानले जाते. चार ते पाच घरात चांदीचे दागिने बनवण्यास सुरुवात झाली. गावाला उद्योग मिळाला. येथील कारागिरांनी आणि धडी उत्पादकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन हा उद्योग वाढवला. 

सुरुवातीला अत्यंत कष्ट घेऊन हे काम केले जात होते. तेव्हा कोणतीही यंत्रसामुग्री नव्हती. केवळ हाताच्या सहाय्याने सर्व काम केले जात होते. त्याही काळात सुबक, टिकाऊ व आकर्षक दागिने तयार करणार्‍या कारागिरांच्या अथक परिश्रमातून या गावच्या वैभवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर या उद्योगाला एकसंध करून सुसूत्रता आणण्यासाठी हुपरी भूषण कै.य.रा.नाईक यांनी केलेले कार्य या गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. चांदी कारखानदार असोसिएशनची स्थापना करून त्यांनी या उद्योगाला उर्जितावस्था आणली. पुढे घराघरांत हा उद्योग सुरू झाला. येथील कारखानदार चांदीचे दागिने बनवून ते घेऊन संपूर्ण भारतभर फिरू लागले. त्यामुळे येथील व्यवसायाने संपूर्ण देश ही आपली बाजारपेठ गृहित धरून मार्गक्रमण केले. व्हायब्रेटर पॉलिश, तास, मिना, चेन आदींसह अनेक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात येऊ लागला. हुपरीसह यळगूड, तळंदगे, इंगळी, पट्टणकोडोली, रेंदाळ, मांगूर आदी गावांत या व्यवसायाने विस्तार केला. जवळपास पाच हजारांहून अधिक चांदी कारखाने व वीस हजारांहून अधिक कारागीर या व्यवसायाशी जोडले गेले. 

सध्या हा उद्योग कठीण स्थितीतून जात आहे. केंद्र शासनाची क्लस्टर योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, हुपरी क्लस्टर ऑर्नामेंट असोसिएशनचे अध्यक्ष दिनकरराव ससे, विलासराव नाईक, अ‍ॅड.एम टी.देसाई यांच्यासह संचालकांनी मोठे प्रयत्न केले. आता मेक इन इंडिया हे शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण आहे. त्या धर्तीवर अहमदनगर येथे गोल्ड सेंटरची स्थापना करून 6 कोटींचा निधीही देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे हुपरी येथेही सिल्व्हर सेंटर ची स्थापना करून राज्य शासनाने त्यासाठी 25 कोटींचा निधी दिल्यास हुपरी येथे सुसज्ज असे कॉमन फॅसिलिटी सेंटर, डिझायनिंग सेंटर, ट्रेनिंग सेंटर, चेन मेकिंग व विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह उद्योगाला नवी उभारी येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यासाठी चांदी कारखानदार असोसिएशनने पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. आ. सुरेड हाळवणकर, आ.डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्‍न हाती घेतला तर हुपरी परिसरातील या उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे.