Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Kolhapur › हुपरीत भाजपची सरशी; सभागृह त्रिशंकू

हुपरीत भाजपची सरशी; सभागृह त्रिशंकू

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:48AM

बुकमार्क करा

हुपरी : अमजद नदाफ 

लोकलढ्यातून निर्माण झालेल्या हुपरी नगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारून चंदेरी नगरीत आपला झेंडा फडकविला. नगरीच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्या सौ. जयश्री महावीर गाठ यांना मिळाला. भाजपला 7, ताराराणी आघाडीला 5, शिवसेनेला 2, श्री अंबाबाई आघाडीला 2 जागा मिळाल्या तर अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळवला. हुपरी नगरपालिका भाजपकडे खेचून आणण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांना यश आले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. रिपब्लिकन पक्षाने भाजपच्या साथीने 2 जागांवर विजय संपादन केला.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.जयश्री गाठ यांनी प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या सौ. सीमा जाधव यांचा तब्बल 2050 मताधिक्याने पराभव केला. हुपरी ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी हुपरीत लोकलढा उभारला गेला. कृती समितीने सातत्याने पाठपुरावा करून हुपरी नगरपालिका स्थापन करण्यात मोठे योगदान दिले. त्यानंतर शासनाने हुपरीत नगरपालिका स्थापन करून तातडीने निवडणूक जाहीर केली. त्यानंतर भाजप, शिवसेना, ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी आघाडी आणि श्री अंबाबाई विकास आघाडीने उमेदवार उभे करून चुरस निर्माण केली. सभा, पदयात्रा आदींनी प्रचाराचा धुरळा उडाला होता. बुधवारी चुरशीने 85 टक्के मतदान झाले होते.

येथील यशवंत मंगल कार्यालयात आज सकाळी 9 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या मतमोजणीचा पहिला निकाल 10.30 वाजता प्रभाग क्र. 3 चा निकाल लागला. त्यामध्ये श्री अंबाबाई आघाडीच्या अमर गजरे यांना विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या फेरीपासून सौ. जयश्री गाठ यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. सौ. गाठ  7247 मतांनी विजयी झाल्या. काही वेळातच अन्य निकाल हाती आले. त्यानंतर शहरात मोठा जल्लोष सुरू झाला. यावेळी पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, स.पो.नि. नामदेव शिंदे आणि कर्मचार्‍यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
रेंदाळ जि.प. मतदार संघात राहुल आवाडे यांच्याविरोधात महावीर गाठ यांनी निकराची झुंज दिली होती. त्यांच्या पत्नी सौ. जयश्री यांना भाजपने उमेदवारी देऊन ही निवडणूक चुरशीची केली. हुपरीच्या जनतेने त्यांच्या पत्नी सौ. जयश्री गाठ यांना प्रथम नगराध्यक्षपदाचा मान दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार सौ. दीपाली बाळासो शिंदे यांचा नामुष्कीजनक पराभव झाला. त्यांना केवळ 217 मते मिळाली.

प्र. 7 मध्ये मतविभागणीचा फटका

प्रभाग क्र.7 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 12 उमेदवार आपले नशीब आजमावत होते. याठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे मत विभागणी झाली. त्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत मतदारांनी भाजपच्या रफिक मुल्ला यांना साथ देऊन त्यांना नगरपालिकेच्या पहिल्या सभागृहात पाठवले तर शिवसेनेच्या सौ. पूनम राजेंद्र पाटील यांना जनतेचा कल मिळाला.