Tue, Mar 26, 2019 11:47होमपेज › Kolhapur › ‘शिक्षण वाचवा’साठी जनसागर रस्त्यावर

‘शिक्षण वाचवा’साठी जनसागर रस्त्यावर

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘कॉर्पोरेट शाळा रद्द करा’, ‘शिक्षणाचे खासगीकरण थांबलेच पाहिजे’, गरिबांचे शिक्षण वाचविण्यासाठी हाक देत, कोल्हापुरात भर उन्हात हजारोंचा जनसागर रस्त्यावर उतरला. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी काढलेल्या विराट महामोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालकांनी शासनाच्या अशैक्षणिक धोरणाचा निषेध केला. महामोर्चात लहान मुले, महिला आणि वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. 

शिक्षण वाचवा नागरी कृती समिती, शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे शुक्रवारी ‘शिक्षण वाचवा’ महामोर्चा काढण्यात काढण्यात आला. गांधी मैदान येथे सकाळपासून विद्यार्थी, पालक, शिक्षक जमण्यास सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, महिला वाहनांनी येत होत्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिला, विद्यार्थी सावलीचा आधार घेऊन बसले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास महापौर स्वाती यवलुजे, नगरसेविका निलोफर आजरेकर यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महामोर्चास सुरुवात झाली. 

उन्हाची पर्वा न करता महिला, नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. शाळकरी मुले ‘शिक्षण वाचवा’ असे लिहिलेल्या शाळेच्या पाट्या घेऊन आई-वडिलांसमवेत मोर्चासाठी आले होते. ‘शिक्षणमंत्री, पालकमंत्री राजीनामा द्या’, ‘वाड्या-वस्त्यांवरील शाळा बंद करू नका’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करीत महिला, विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. शहीद भगतसिंग यांचे चित्र व प्रबोधन फलकाद्वारे अखिल भारतीय नौजवान सभेच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला. मोर्चाच्या मार्गावर दोन्ही बाजूला उभे असणारे नागरिक मोबाईलवर शूटिंग व फोटो घेत होते. महामोर्चामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
 

शाळा बंद करून दाखवाच : एन. डी.

राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांच्या मुलांना मोफत आणि सक्‍तीचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली; पण हे सरकार त्याच शिक्षणाचे कंपनीकरण करून गोरगरिबांच्या शाळा मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशा या सरकारने शाळा बंद करून दाखवाव्याच, असा निर्वाणीचा इशारा देत आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शेजारील जिल्ह्यातील शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल, असेही  प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना सांगितले.
घोडा दमतो की मैदान दमते ते बघून घेऊ, असे सांगत प्रा. पाटील म्हणाले, आजच्या विराट मोर्चातून जनशक्‍तीचा रेटा काय असतो, हे पोलिसांनी पाहिले आहे. सरकारनेही याची दखल घ्यावी, जोपर्यंत सरकार शाळा बंदचा निर्णय मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. 

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली शिक्षणाधिकार कायदा केला. यातून त्यांचे विचार काळाच्या पुढे असल्याचे दिसून येते. कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा चालवण्यास देऊन गोरगरिबांच्या मुलांचे काय होणार, असा सवाल करून आता गप्प बसून चालणार नाही, असे ते म्हणाले.कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार म्हणाले, शासनाने राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षणाचा आदेश पायदळी तुडवला आहे. दोन महिने चळवळ सुरू असताना प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला आहे. आंदोलकांच्या संयमाचा अंत पाहू नका.

दसरा चौकात गणी आजरेकर फौंडेशनतर्फे मोर्चेकर्‍यांना चॉकलेट व पाणी वाटप करण्यात आले. व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाची सांगता झाली. याप्रसंगी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, माजी आ. भगवानराव साळुंखे, एस. डी. लाड, भरत रसाळे, वसंतराव देशमुख, अशोक पोवार, रमेश मोरे, गिरीश फोंडे, गणी आजरेकर, दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, जयंत आसगावकर, आर. वाय.पाटील, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, लाला गायकवाड, प्रमोद तौंदकर, संदीप मगदूम, सुधाकर निर्मळे उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने मोर्चेकर्‍यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलची रुग्णवाहिका कार्यरत होती. मोर्चावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली 12 पोलिस अधिकारी व शंभरहून अधिक कर्मचारी तैनात होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, huge crowd, on road, saving education